Join us

रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने पुन्हा एकदा शेणखताला शेतकऱ्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:18 IST

Manure : खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता टिकवणे कठीण होत आहे. तर पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात गुरेढोरे असायची आणि त्यांचे शेण शेतात खत म्हणून वापरले जात असे.

खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता टिकवणे कठीण होत आहे. तर पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात गुरेढोरे असायची आणि त्यांचे शेण शेतात खत म्हणून वापरले जात असे. ज्यामुळे सेंद्रिय कर्ब संतुलित राहून जमिनीची सुपीकता टिकून रहायची. 

परंतु यांत्रिक युगात ट्रॅक्टरच्या वापरामुळे बैलजोडीची संख्या कमी झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडे मुबलक शेणखत देखील अलीकडे उपलब्ध नाही. मात्र रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचा जास्त खर्च होतोय.

यामुळे शेणखताकडे शेतकऱ्यांचा कल पुन्हा एकदा वाढला आहे कारण रासायनिकच्या तुलनेत शेणखत हे स्वस्त असून शेतीसाठी दीर्घकाळ फायदेशीर ठरते आहे.

रासायनिक खतांचा वापर आणि सुपीकता

• रासायनिक खतांचा वापर जरी पिकांच्या वाढीसाठी फायदेशीर असला तरी त्याचा दीर्घकालीन परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होतो. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता हळूहळू कमी होत जाते.

• यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेणखताकडे पुन्हा एकदा कल वाढला आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करत घरच्या शेणखताचा वापर सुरू केला आहे.

• राज्याच्या अनेक भागात सध्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेणखत शेतात पसरवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दर्जेदार शेणखत कसे तयार होते?

गुरांच्या सांगोपणातून मिळणारे शेणखत जमिनीची सुपीकता वाढवते. जुलै महिन्यापासून जनावरांचे मलमूत्र आणि शेण एकत्र करून शेतकरी गोठ्याच्या बाजूला एका खड्ड्यात सर्व कुजवितात. यामुळे एक वर्षात उत्कृष्ट दर्जाचे शेणखत तयार होते. हे खत पीक काढणी नंतर शेतात पसरवून उपयोगी पडते.

पर्यावरणपूरक, फायदेशीर पर्याय

शेणखत हा एक पर्यावरणपूरक आणि अत्यंत फायदेशीर पर्याय आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेणखताच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. हे न फक्त जमिनीच्या सुपीकतेसाठी, तर शेतकऱ्यांच्या खर्चाला कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

हेही वाचा : बळीराजाने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नव्हे तर व्यवसाय म्हणून पहावे; वाचा आधुनिक शेती व्यवसायाचे फायदे

टॅग्स :सेंद्रिय खतखतेगायशेती क्षेत्रशेतकरीशेती