Join us
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अवगत केले फायद्याचे विविध सेंद्रिय निविष्ठा निर्मिती तंत्र

By रविंद्र जाधव | Updated: December 15, 2024 21:06 IST

Organic Farming Training To Farmer : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत सेंद्रिय निविष्ठा निर्मिती प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

नांदगाव : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत सेंद्रिय निविष्ठा निर्मिती प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात प्रेरणा कृषि शेतकरी गट (कऱ्ही) व एकवई येथील जय श्रीराम शेतकरी गटातील सदस्यांचे दुसऱ्या वर्षातील गावपातळीवरील सेंद्रिय निविष्ठा निर्मिती प्रात्यक्षिक प्रशिक्षण मौजे कऱ्ही येथील सेंद्रिय गट प्रमुख विठ्ठल दत्तु डोंगरे यांच्या शेतावर पार पडले.

कार्यक्रम प्रसंगी साकोरा येथील सेंद्रिय शेतकरी भानुदास रामदास सुरसे, कृषि मित्र प्रकल्प व युवा मित्रा संस्था सिन्नरचे बाळासाहेब राधाकिसन जाधव हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. भानुदास सुरसे यांचे स्वागत बाणेश्वर ऑर्गेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक भागीनाथ घुगे यांनी केले, तसेच बाबासाहेब जाधव यांचे स्वागत सेंद्रिय शेती गट प्रमुख विठ्ठल डोंगरे यांनी केले.

यावेळी एकवईचे कृषि सहाय्यक एस. पी. डोमाडे यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून विषमुक्त अन्नाच्या महत्त्वावर भाष्य केले आणि कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर भानुदास सुरसे यांनी दहा ड्रम थेअरी अंतर्गत जमिनीवर देण्यात येणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा निर्मितीची प्रात्यक्षिके केली.

यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी वेस्ट डिकंपोझर, ह्युमिक अँसिड, फुल्विक अँसिड, सप्त धान्य स्लरी, जीवामृत स्लरी इत्यादी निविष्ठांचा समावेश होता. तर पिकांना होणारे फायदे व त्याचे कार्यान्वयन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबत फवारणीसाठीचे ड्रम आणि त्यामध्ये तयार होणाऱ्या निविष्ठांचा वापर कसा करावा, यावरही मार्गदर्शन केले.

त्यानंतर बाळासाहेब जाधव यांनी जीवामृत, दशपर्णी आणि बिजामृत यांचे प्रात्यक्षिक करून त्याबाबत मार्गदर्शन केले. तर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्माचे एस.टी. कर्नर यांनी बायोडायनॅमिक कंपोस्ट, जैविक बीजप्रक्रिया, सेंद्रिय शेती प्रमाणिकरण पद्धत, समभाग निधीकरीता गटातील शेतकऱ्यांना कंपनी शेअर्स सदस्य म्हणून घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी तज्ञ प्रशिक्षक व शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हेही वाचा : शाळेतील शेतकऱ्यांची मुलं म्हणताहेत 'आमची भाजी आम्ही पिकवू'

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीसेंद्रिय शेतीनाशिकशेती