Join us

शेतकऱ्यांचा नैसर्गिक कीटकनाशक मित्र दशपर्णी अर्क; कमी खर्चात जास्त उत्पादनाचा विश्वासू मार्ग

By रविंद्र जाधव | Updated: September 7, 2025 15:04 IST

Dashparni Ark : दशपर्णी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी एक प्रभावी आणि सुरक्षित कीटकनाशक मानले जाते. पारंपरिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत चालली आहे.

दशपर्णी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी एक प्रभावी आणि सुरक्षित कीटकनाशक मानले जाते. पारंपरिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत चालली आहे.

जमिनीतील जिवाणूंचा नाश होतो. पर्यावरणाचे प्रदूषण होते आणि शेतीमालामध्ये विषारी अंश आढळून येतात. या सगळ्याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावर होतो. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीच्या दिशेने एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय म्हणून दशपर्णी अर्काचा वापर वाढवणे काळाची गरज आहे.

दशपर्णी अर्क दहा प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या पानांपासून तयार केला जातो. या वनस्पती स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होतात. ज्यात करंज, कडुनिंब, रुई, गुळवेल, घाणेरी, पपई, सीताफळ, पांगारा आणि निर्गुडी या वनस्पतींचा समावेश असतो.

या सर्व वनस्पतींमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात आणि या वनस्पती पारंपरिक वैद्यकीय पद्धतीत औषध म्हणून वापरल्या जातात. त्यामुळे अशा वनस्पतींच्या संयोजनातून तयार होणारा अर्क पिकांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या कीटकांचा बंदोबस्त करण्यात उपयुक्त ठरतो.

दशपर्णी अर्काचा वापर पिकांवरील रसशोषक कीड, फुलकिडे, तुडतुडे, खोडकिडा, भुरी अशा प्रकारच्या किडींवर परिणामकारक ठरतो. नियमित फवारणी केल्यास या कीटकांचा प्रादुर्भाव टाळता येतो. कीटकनाशकांचा प्रतिकूल परिणाम न होता पिके निरोगी राहतात. तसेच फळे आणि भाज्यांचा दर्जा चांगला राहतो. पीक उत्पादनामध्ये वाढ होते.

या अर्कामुळे जमिनीतील पोषक द्रव्ये जपली जातात. जमिनीतील उपयोगी जिवाणूंचे संवर्धन होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. सेंद्रिय घटकांची उपस्थिती असल्यामुळे अन्नधान्यात रासायनिक अवशेष राहत नाहीत आणि त्यातून तयार होणारा शेतीमाल सुरक्षित आणि आरोग्यवर्धक ठरतो.

दशपर्णी अर्काची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दशपर्णी अर्क शेतकऱ्यांसाठी अत्यंत स्वस्त आणि किफायतशीर आहे. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती आणि इतर घटक गावाच्या परिसरातच उपलब्ध होतात.

तसेच यासाठी कुठल्याही मोठ्या यंत्रसामग्रीची किंवा गुंतवणुकीची आवश्यकता नसते. त्यामुळे लहान शेतकरी सुद्धा सहजपणे हा अर्क तयार करून आपल्या शेतीमध्ये वापर करू शकतो. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो आणि उत्पादन खर्च कमी होतो.

दशपर्णी अर्काचा वापर हा केवळ पीक संरक्षणापुरता मर्यादित नसून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. रासायनिक औषधांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी अशा प्रकारचे नैसर्गिक पर्याय आवश्यक आहेत.

जैवविविधता जपण्यासाठी अशा जैविक कीटकनाशकांचा वापर आवश्यक आहे. यामुळे शेतीतील सेंद्रिय दृष्टिकोन बळकट होतो. उत्पादन टिकाऊ राहते. जमिनीचा पोत सुधारतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नधान्य मिळते आणि एकूण शेती क्षेत्र अधिक शाश्वत होते.

या सर्व बाबी लक्षात घेता दशपर्णी अर्काचा वापर हा केवळ एक सेंद्रिय पर्याय न राहता सेंद्रिय क्रांतीकडे नेणारे एक प्रभावी साधन ठरते. शेतकऱ्यांनी पारंपरिक अनुभवातून शिकून आधुनिक सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करताना या प्रकारच्या अर्कांचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करावा.

हेही वाचा : बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीकीड व रोग नियंत्रणपीक व्यवस्थापनपीकखतेसेंद्रिय शेती