Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची थट्टा; संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादकांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ ३० तासांचा कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:42 IST

नैसर्गिक आपत्तीमध्ये फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विमा संरक्षित रक्कम दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना विहित मुदतीत विमा पोर्टलवर अर्ज सादर करावा लागतो. परंतु संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ ३० तासांचा कालावधी दिल्याने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे दिसून येते.

प्रशांत शिंदे 

नैसर्गिक आपत्तीमध्ये फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विमा संरक्षित रक्कम दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना विहित मुदतीत विमा पोर्टलवर अर्ज सादर करावा लागतो. परंतु संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ ३० तासांचा कालावधी दिल्याने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे दिसून येते.

शासनाने यंदा हवामान आधारित फळपीक विमा योजना डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या आठ फळपिकांसाठी राबवली आहे. शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. याबाबत १३ जून रोजी सायंकाळी जिल्हा कृषी विभागाने तालुका कृषी कार्यालय, कृषी सहायक अधिकारी यांना सूचना केल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी विमा योजना ऐच्छिक आहे. योजनेत सहभागासाठी फळपिकांचे किमान उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे आवश्यक आहे. तर कमाल चार हेक्टर मर्यादा आहे. योजनेत सहभागासाठी संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष पिकांसाठी १४ जून, चिकू, मोसंबी पिकांसाठी ३० जून, डाळिंब पिकाला १४ जुलै तर सीताफळ पिकाला ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

फळ पिके - विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर)

संत्रा - १ लाखमोसंबी - १ लाखपेरू - ७० हजारचिकू - ७० हजारडाळिंब - १ लाख ६० हजारलिंबू - ८० हजारसीताफळ - ७० हजारद्राक्ष - ३ लाख ८० हजार

कोणती कागदपत्रे आवश्यक ?

योजनेसाठी अर्ज करताना अॅग्रीस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बैंक खाते तपशील, जमीन उतारा, जियो टॅग फोटो, ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे.

कोणत्या पिकांना किती मुदत ?

संत्रा, पेरु, लिंबू आणि द्राक्ष पिकांसाठी १४ जून, चिकू, मोसंबी पिकांसाठी ३० जून, डाळिंब पिकाला १४ जुलै तर सीताफळ पिकाला ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

• संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने फळपिक विम्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी केवळ ३० तासांचा कालावधी दिल्याचे प्रसिद्धीपत्रकातून दिसून येते. १३ जूनला सायंकाळी विमा पोर्टल सुरू झाले.

• यानंतर कृषी विभागाने तालुकास्तरावर शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना केल्या. परंतु वरील चार पिकांचे अर्ज १४ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार होते.

• एका दिवसात योजनेवी माहिती घेणे, कागदपत्रे काढणे आणि पैशाची तजवीज करून अर्ज करणे शक्य आहे का? शिवाय एकाच दिवशी एकाच वेबसाईटवर सर्व शेतकरी अर्ज करू लागले तर विमा पोर्टल सुरळीत चालणार का, असा प्रश्न निर्माण होतो. १४ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विमा पोर्टल वेबसाईटला एरर येत असल्याच्या तक्रारी होत्या.

राज्य शासनाने यंदा आठ फळपिकांसाठी विमा योजना राबवली आहे. शनिवारी दिवसभर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. परंतु काही पिकांना एक दिवसाचा वेळ मिळल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारला मुदत वाढवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मुदत वाढून मिळण्याची शक्यता आहे. - सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर.

हेही वाचा : ताडकळस येथील २२ वर्षीय पदवीधर तरुणाने भाजीपाला उत्पादनातून मिळविले नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न

टॅग्स :पीक विमाशेतकरीशेतीफळेअहिल्यानगरशेती क्षेत्र