Join us

शेतकऱ्यांना 'पूर्णा' कडून मिळाला दिलासा; उसाच्या वाढीव हप्त्यापोटी ९ कोटी ९८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर केले वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:21 IST

Purna Sugar factory : पूर्णा सहकारी साखर कारखान्याने उसाच्या पहिल्या हप्त्यानंतर खरीप पेरणीसाठी थोडाबहुत फायदा होईल, हे पाहून २५० रुपये प्रतिटन वाढीव हप्त्यापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ कोटी ९८ लाख रुपये वर्ग केले आहेत.

पूर्णा सहकारी साखर कारखान्याने उसाच्या पहिल्या हप्त्यानंतर खरीप पेरणीसाठी थोडाबहुत फायदा होईल, हे पाहून २५० रुपये प्रतिटन वाढीव हप्त्यापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ कोटी ९८ लाख रुपये वर्ग केले आहेत. ऊस गाळप हंगामातील वाहतूक ठेकेदारांना कमिशन रक्कमही कारखान्याने दिली आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत विभागातील सर्वात जास्त ऊस गाळप करणारा पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता प्रतिटन २३५० रुपये अदा केले होते. खरीप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हातभार लागावा, यासाठी कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी उसाच्या वाढीव हप्त्यापोटी प्रतिटन २५० रुपये प्रमाणे ९ कोटी ९८ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे.

ऐन खरिपाच्या पेरणीत पूर्णा सहकारी साखर कारखान्याने उसाचा वाढीव हप्त्या दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे कामी आले आहेत. सद्यःस्थितीत मोजक्या काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली असली, तरी अजून बरेच शेतकरी पेरणी करायचे राहिले आहेत. पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

कारखाना प्रशासनाने २०२४-२५ गाळप हंगामात ऊस वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांना देखील कमीशनपोटी ५ कोटी रुपये अदा केले आहे. २०२५-२६ गाळप हंगामासाठी कारखान्याने वाहतूक करारास सुरुवात केली आहे.

उसाचे पैसे वेळेवर द्यावेत

दोन पैसे मिळाल्यानंतर संसाराला हातभार लागतो म्हणून शेतकरी उसाची लागवड करतो. परंतु कारखान्यांना ऊस दिल्यानंतर उसाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी निराश होऊन 'उसाची लागवड उगाच केली' असे म्हणून गुपचूप बसतो. व्यवस्थापनाने या बाबीची दखल घेणे गरजेचे आहे.

अनेक शेतकऱ्यांनी 'पूर्णा'कडे ऊस घातला होता. यापूर्वी २३५० रुपये मिळाले. ऊसाच्या वाढीव हप्त्यापोटी २५० रुपये खरीप हंगामात पैसे मिळाले. त्यामुळे खरीप हंगामात बियाणे, खते घेण्यासाठी कामा येतील. - राजू आसोले, शेतकरी.

सद्यःस्थितीत खरीप हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना उसनवारी करावी लागत आहे. पूर्णा कारखान्याने उसाचे पैसे वेळेवर दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याचे झाले आहे. - श्रीराम इंगोले, शेतकरी.

पूर्णा सहकारी साखर कारखान्याने उसाचा पहिला हप्ता प्रति टन २३५० रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. खरीप पेरणीसाठी कारखाना प्रशासनाने निर्णय घेत उसाच्या वाढीव हप्त्यापोटी प्रतिटन २५० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत प्रतिटन २६०० रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. - केशव अकुसकर, कार्यकारी संचालक, पूर्णा कारखाना.

हेही वाचा : परिपूर्ण नियोजनाचा झाला फायदा; वादळात केळी आडवी पण काकडीने दिला आधार

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीऊससाखर कारखानेहिंगोलीखरीप