Join us

Urea Supply Shortage: शेतकऱ्यांना मिळेना युरिया; कृषी केंद्र चालकाकडून युरिया देण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 10:03 IST

Urea Supply Shortage: दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतामध्ये चांगल्या प्रकारची पिके आलेली आहेत; परंतु दौंडच्या ग्रामीण भागातील कोणत्याच कृषी भांडारात Urea Shortage यूरिया मिळत नाही असे चित्र आहे.

दादा चौधरीभांडगाव : दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतामध्ये चांगल्या प्रकारची पिके आलेली आहेत; परंतु दौंडच्या ग्रामीण भागातील कोणत्याच कृषी भांडारात यूरिया मिळत नाही असे चित्र आहे.

दौंडच्या दक्षिणेकडील ग्रामीण भागामध्ये दोन वर्षानंतर बाजरीचे, मकाचे पीक चांगले आलेले आहे; परंतु या पिकांसाठी शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होताना दिसत नाही; तसेच उसासाठीसुद्धा या दिवसांमध्ये युरियाचा वापर केला जातो.

युरियाची खरोखरच टंचाई आहे का, हा व्यापाऱ्यांचा साठेबाजार आहे, हे कळायला मार्ग नाही. काही दुकानांमध्ये युरिया घ्यायचा असेल तर त्याच्याबरोबर गरज नसताना इतर खते घ्यावी लागतात. तरच युरिया मिळतो, नाही तर युरिया मिळत नाही.

काही दुकानदार असे आहेत की, जे फक्त मोठ्या शेतकऱ्यांनाच युरिया देतात, जे शेतकरी त्यांचे कायमचे गिऱ्हाईक असतात. इतर गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांना युरियाच मिळत नाही, अशा शेतकऱ्यांनी काय करावे.

काही दुकानदार युरियाऐवजी त्याला पर्याय म्हणून इतर खते घेण्याचा पर्याय सुचवतात; परंतु त्या खतांचे जास्त दर असतात आणि ते शेतकऱ्यांना घ्यायला परवडत नाहीत. सरकार कधी तरी या गोष्टीकडे लक्ष देईल का? असा प्रश्न ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी विचारत आहेत.

निवडणूक आली की, सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करतात आणि आपली राजकारणातली पोळी भाजून घेतात; परंतु शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्यांकडे कोणताच राजकीय पक्ष लक्ष देत नाही. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पिके चांगली आली आहेत; परंतु युरियाच उपलब्ध नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

मी रविवारी (ता. १४) रोजी केडगाव, यवत, भांडगाव, पाटस, वरवंड, चौफुला, खोर, देऊळगावगाडा या ठिकाणी युरियासाठी फिरलो, परंतु मला कुठेच युरिया मिळाला नाही. युरियाचा तुटवडा यावर्षीच आहे, असे नाही. दरवर्षीच या काळामध्ये अशीच परिस्थिती असते. युरियाच्या या तुटवड्याकडे शासन, प्रशासन यांनी लक्ष द्यावे, ही विनंती. - श्यामदास चौधरी, शेतकरी, खोर

दौंड तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या खतांचा किंवा युरियाचा तुटवडा नाही. जर कोणता कृषी दुकानदार कृत्रिमरीत्या एखाद्या खताचा किवा युरियाचा तुटवडा निर्माण करीत असेल तर शेतकऱ्यांनी तशी लेखी तक्रार पंचायत समिती, दौंड किंवा कृषी विभाग, दौंड यांच्याकडे द्यावी. त्या कृषी दुकानदारांवर चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल. - राहुल माने, दौंड तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :शेतकरीशेतीखतेपीकखरीपपाऊसपेरणी