Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता; कृषी विभागाकडून हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 11:56 IST

मक्याच्या बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी कृषी विभागाने संबंधित बियाणे कंपनीला पत्र पाठवून येत्या २ फेब्रुवारीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे निर्देश दिले आहेत.

मक्याच्या बोगस बियाणांमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या पोरज (ता. खामगाव) येथील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी खामगाव कृषी विभागाने संबंधित बियाणे कंपनीला पत्र पाठवून येत्या २ फेब्रुवारीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे निर्देश दिले आहेत.

यामुळे नायदेवी पाठोपाठ पोरज येथील शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोरज येथे बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी मक्याचे बियाणे निकृष्ट निघाल्याने कणसात दाणे न भरल्याचा गंभीर आरोप केला आहे.

दरम्यान या प्रकरणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली असून, त्याची दखल घेत कृषी विभागाने चौकशी सुरू केली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी व संबंधित बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण?

पोरज येथील काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामात एका खासगी कंपनीचे मक्याचे बियाणे खरेदी करून सुमारे ५० एकर क्षेत्रावर पेरणी केली होती. मात्र पीक तयार होऊनही कणसात दाणे न भरल्याने संपूर्ण पीक उत्पादनाविना राहिले. परिणामी संबंधित शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

यासंदर्भात सखोल चौकशी सुरू आहे. बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींशी दोन-तीन वेळा चर्चा करण्यात आली; मात्र त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संबंधित कंपनीला लेखी पत्र देण्यात आले आहे. - सुनील पवार, तालुका कृषी अधिकारी, खामगाव

हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब

English
हिंदी सारांश
Web Title : Compensation likely for farmers hit by bogus seeds; action initiated.

Web Summary : Buldhana farmers who suffered losses due to fake maize seeds may receive compensation. The agriculture department has instructed the seed company to compensate affected farmers by February 2nd following complaints of poor seed quality and crop failure.
टॅग्स :शेती क्षेत्रबुलडाणाशेतकरीशेतीपीकमका