महेश घोलपओतूर : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार परिसरातील डोंगराळ व कमी पाण्याच्या माळरानावरही आधुनिक शेतीतून भरघोस उत्पादन मिळवता येते, हे तरुण शेतकरी कुणाल कैलास कुटे यांनी आपल्या अभिनव प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.
पारंपरिक शेती पद्धतींना छेद देत त्यांनी डाळिंब बागेत मिरचीचे आंतरपीक घेत उत्पन्नवाढीचा नवा आणि प्रभावी मार्ग उभा केला आहे.
कुटे यांनी सुमारे दोन एकर डाळिंब बागेत २१ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘७८६’ या सुधारित जातीच्या मिरचीची लागवड आंतरपीक म्हणून केली. या लागवडीसाठी त्यांनी ठिबक सिंचन व मल्चिंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.
ठिबक सिंचनामुळे कमी पाण्यात पिकांना आवश्यक तेवढेच पाणी अचूक प्रमाणात दिले जाते, तर मल्चिंग पेपरमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि तण नियंत्रण प्रभावीपणे साध्य होते. यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन पिकांची वाढ जोमदारपणे होते.
या संपूर्ण प्रयोगासाठी त्यांनी सुमारे १४ हजार रुपये मल्चिंगसाठी, २० हजार रुपये शेणखतासाठी आणि १० हजार रुपये बेसल डोससाठी खर्च केला आहे.
डोंगराळ भागात पाण्याची टंचाई ही मोठी समस्या असतानाही ठिबक सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत झाली असून पिकांसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
डाळिंब बागेत मिरचीचे आंतरपीक घेतल्यामुळे जमिनीचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत आहे. मुख्य पिकासोबत आंतरपीकातून अतिरिक्त उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होते.
शिवाय, विविध पिके घेतल्यामुळे जोखीम कमी होत असून शेती अधिक शाश्वत बनते. कुटे यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देऊन या पद्धतीची माहिती घेत आहेत. बदलत्या हवामान परिस्थितीत आणि मर्यादित संसाधनांमध्येही नियोजनबद्ध व तंत्रज्ञानाधारित शेती केल्यास यश मिळवता येते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगांची गरज दिवसेंदिवस वाढत असताना कुटे यांसारख्या तरुण शेतकऱ्यांचे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत.
त्यांच्या या प्रयोगामुळे डोंगराळ आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी शेतीचा नवा मार्ग खुला झाला असून, भविष्यात अशा आंतरपीक पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर अवलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा: साडेचार फूट सरी ठेवून ८६०३२ उसाची लागवड; उत्पादनात एकरी १६० टनाची मजल मारणार
Web Summary : Farmer Kunal Kute in Junnar doubled income by intercropping chili peppers in his pomegranate orchard using drip irrigation and mulching. This innovative approach saves water, controls weeds, and boosts yields, inspiring other farmers in the drought-prone region.
Web Summary : जुन्नर के किसान कुणाल कुटे ने ड्रिप सिंचाई और मल्चिंग का उपयोग करके अपने अनार के बाग में मिर्च की अंतरफसल लगाकर आय दोगुनी की। इस नवीन दृष्टिकोण से पानी की बचत होती है, खरपतवार नियंत्रण होता है और उपज बढ़ती है, जिससे सूखे प्रवण क्षेत्र के अन्य किसानों को प्रेरणा मिलती है।