Join us

शेतकरी बांधवांनो उन्हाळ्यात पोटभर पाणी प्या; विविध आजार पळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 8:58 AM

प्रौढांनी दिवसभरात तीन लिटर पाणी प्यावे 

सध्या उकाडा वाढल्याने पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होतो. घसा कोरडा पडल्यामुळे शरीराला वारंवार पाण्याची गरज भासते. मात्र, बहुतांशवेळा आपण याकडे दुर्लक्ष करतो. मग शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्वचेचे आणि पचनाचे आजार डोके वर काढतात. हे टाळण्यासाठी उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते.

उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. प्रौढ व्यक्तींनी दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी पिले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. मात्र जास्त पाणी पिल्यामुळे हृदयावर अधिक भार पडू शकतो. पोटात जळजळ वाढू लागते. जास्त पाण्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडू शकते. रक्तातील सोडियम पातळी कमी होते. त्यामुळे पाण्याविषयी नियमावली आपण अभ्यासली पाहिजे. त्यानुसार पाणी प्यायले पाहिजे.

हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

पाणी पिण्याचे फायदे!

पाणी हे एखाद्या क्लिंजरप्रमाणे शरीरात काम करते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटभर पाणी पिल्यामुळे त्वचेवर चमक येते. तसेच सकाळी उठल्यावर पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शिवाय चयापचय क्रिया सुधारते. रिकाम्यापोटी पाणी अधिक फायदेशीर ठरते.

पोटभर पाणी पिणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर येण्यास मदत होते. सर्वांनी गरजेप्रमाणे पाणी प्यावे. परंतु, ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी अधिकाधिक पाणी प्यावे. जेणेकरून मूत्रपिंडाचे खडे बाहेर पडण्यास मदत होईल. शरीरातील द्रव पदार्थाचे प्रमाण नियंत्रित ठेवून आरोग्य सुधारण्यास मदत होईल. - डॉ. अशोक गवळी, तालुका आरोग्य अधिकारी

टॅग्स :हेल्थ टिप्सशेतीशेतकरीआरोग्यसमर स्पेशल