Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बांधवांनो यंदा रासायनिक खतांचा अतिवापर टाळा; सेंद्रिय खते वापरण्याचा कृषी विभागाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:44 IST

खरिप हंगामाच्या पेरणीची लगबग, खते, बी-बियाणे खरेदीवर बळिराजाचा भर

शेतीत उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला जातो. मात्र, या खतांच्या अतिवापरामुळे जमिनीच्या पोतवर परिणाम होऊ शकतो. जमिनीचे आरोग्य चांगले रहावे, याकरिता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खते, औषधांचा वापर करावा.

आवश्यक तेवढाच रासायनिक खतांचा उपयोग करणे आवश्यक झाले आहे. दरम्यान, दिवसेंदिवस खते, बी-बियाण्यांच्या संख्येतही वाढ होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. उत्पादन वाढीसाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करण्यात येतो. गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे.

यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, असे असले तरी जमिनीचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी कृषी विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. याअंतर्गत शेतकऱ्यांकडून शेतातील मातीचे परीक्षण करून मृदा आरोग्य पत्रिकेद्वारे शेतात पीक बदल केल्यास उत्पादन वाढवण्यास मदत होते.

काय आहे जमिनीचा सामू

■ सर्वसाधारणपणे कुठल्याही पदार्थाचा सामू जर सात या अंकावर असेल तर तो पदार्थ उदासीन क्रिया दर्शवितो. मातीच्या बाबतीत मात्र ६.५ ते ७.५ या दरम्यान असणाऱ्या सामूची जमीन उदासीन मानली जाते. मातीचा सामू ६.५ च्या खाली असेल तर जमीन आम्लीय व ७.५ च्या वर असेल तर जमीन विम्लधारी असे मानले जाते. सामू ५.५ ते ८.५ च्या दरम्यान असल्यास अन्नद्रव्यांचा पुरवठा चांगला राहतो.

■ ५.५ पेक्षा कमी सामू असल्यास जमिनीत जास्त आम्ल असते. अशावेळी जमिनीतून पिकांना कॅल्शियम, मॉलिब्डेनम, स्फुरद, गंधक व नत्राची उपलब्धता कमी राहते. तसेच लोह, अॅल्युमिनियम, मँगेनीज, तांबे आणि जस्त यांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते.

मातीची आरोग्य पत्रिका?

■ शेत जमिनीला आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे. अनावश्यक खतांचा पुरवठा टाळून योग्य आणि आवश्यक त्याच पिकांवर भर दिला जातो.

■ मातीची आरोग्य पत्रिका अशी आहे की ज्याद्वारे आपल्याला जमिनीत किती प्रमाणात पोषक तत्त्वे आहेत, मूलद्रव्ये आहेत याची माहिती मिळते.

हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च

टॅग्स :शेतीसेंद्रिय शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनखतेशेती क्षेत्र