आधुनिक शेतीचे विज्ञान, तंत्रज्ञान, आणि नवकल्पनांचा संगम साधणारा एक क्रांतिकारी उपक्रम म्हणजे ‘फार्म सायन्स क्लब’. नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे सुरू झालेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्याची लहर निर्माण झाली आहे. पारंपरिक शेतीपलीकडे विचार करणाऱ्या युवकांसाठी हा क्लब आशेचा किरण ठरतो आहे.
आजच्या युगात केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून राहून शाश्वत उत्पन्न मिळवणे शक्य नाही. बदलते हवामान, वाढती स्पर्धा, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, आणि जलस्रोतांची कमतरता यांसारख्या समस्यांना सामोरे जाताना शेतकऱ्यांना विज्ञानाधिष्ठित निर्णय घेणे अनिवार्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर फार्म सायन्स क्लब ग्रामीण युवकांना शेतीतील नवसंधींबद्दल माहिती देतो आणि त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्यास प्रवृत्त करतो.
कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या पुढाकाराने सध्या चार गावांमध्ये हे क्लब कार्यरत आहेत. ज्यात सगरोळी (ता. बिलोली), कुशावाडी (ता. देगलूर), बावलगाव (ता. बिलोली) आणि बाभूळगाव (ता. धर्माबाद) इत्यादी गावांचा समावेश आहे. तर यामध्ये सहभागी असलेले युवक मृदासंवर्धन, जलसंधारण, सेंद्रिय शेती, उद्यानविद्या, पशुपालन, मत्स्यपालन, तसेच AI आधारित आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धन, शेतमाल प्रक्रिया व थेट विक्री या क्षेत्रात प्रशिक्षण घेत आहेत.
कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ नियमितपणे प्रशिक्षण शिबिरे, शेतभेटी, प्रात्यक्षिके आणि कार्यशाळांचे आयोजन करतात. या माध्यमातून युवकांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि नवकल्पनांची अंमलबजावणी करण्याचा आत्मविश्वास मिळतो. ड्रोन तंत्रज्ञान, मोबाईल ॲप्स, सेंद्रिय खते, जलसिंचन प्रणाली यांसारखी साधने वापरून ही तरुण मंडळी स्वतःच्या शेतात प्रयोगशील शेती करत आहेत.
या क्लबमधून आता युवकांनी स्वतःचे शेतमाल प्रक्रिया उद्योग, ब्रँडेड सेंद्रिय उत्पादनांची विक्री, स्टार्टअप्स सुरू करण्याचा मार्ग धरला आहे. तसेच काहींनी थेट ग्राहकांना विक्री करणारी प्रणाली उभी केली असून कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाने ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होते आहे.
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ सांगतात, "फार्म सायन्स क्लब हा केवळ शिक्षणाचा मंच नाही तर हे एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम साधून तरुणांना शेतीकडे नवे दृष्टिकोन देणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे."
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र