Join us

Fal Pik Vima 2024 : केळी पिकासाठी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अचानक वाढले; अर्जदारांची पडताळणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:57 IST

हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजाराहूंन अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत.

नितीन चौधरीपुणे : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजारांहून अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत केळी पिकासाठी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण तब्बल १९ हजार ५००ने जास्त आहे. ही वाढ संशयास्पद असल्याने अशा अर्जदारांची क्षेत्रीय पडताळणी सुरू केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या सर्व पिकांसाठी हंगामाअखेर एकूण नोंदणी २ लाख ३१ हजार २२२ इतकी झाली होती.

राज्यात आंबिया बहाराच्या हंगामासाठी द्राक्ष, स्ट्रॉबेरी, केळी, मोसंबी, आंबा, काजू, संत्रा, पपई व डाळिंब या पिकांसाठी विमा अर्ज दाखल करण्यात येत असून, कोकणातील आंबा, काजू व अन्य जिल्ह्यांतील संत्रा पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत शनिवारी (दि. ३०) असून, कोकणाव्यतिरिक्त उर्वरित राज्यातील आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर तसेच डाळिंब पिकासाठी १४ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

उर्वरित पिकांसाठी विमा काढण्यासाठीचा कालावधी संपला आहे. या पिकांव्यतिरिक्त मुदत संपलेल्या पिकांसाठी आतापर्यंत १ लाख ७३ हजार १२९ अर्ज आले आहेत. जिल्हानिहाय सर्वाधिक ७१ हजार ३२६ अर्ज जळगावमधून आले आहेत.

त्या खालोखाल सिंधुदुर्गमधून ३३ हजार ९५ अर्ज आले आहेत. गेल्यावर्षी सर्व पिकांसाठी एकूण नोंदणी २ लाख ३१ हजार २२२ इतकी झाली होती. हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार या हंगामासाठी संशयास्पद नोंदणी झाली आहे.

राज्यातील विमा अर्जाची अशी आहे स्थीती■ यंदा राज्यात केळी पिकासाठी ८२ हजार ५८ अर्ज आले आहेत, तर गेल्यावर्षी ६२ हजार ५५९ अर्ज आले होते. त्यामुळे यंदा यात १९ हजार ४९९ अर्जाची वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी ५५ हजार २३६ अर्ज आले होते. त्यात केळी पिकाचा सर्वाधिक समावेश होता.■ बाग नसताना विमा काढणे, जादा क्षेत्राचा विमा काढणे असे गैरप्रकार जिल्ह्यात आढळून आले होते, तर गेल्या वर्षीच्या आंबिया बहारासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ८३७ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली होती.■ त्यात एकट्या जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार २६१ शेतकऱ्यांना तब्बल ३२७ कोटींची भरपाई मिळाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जळगाव जिल्ह्यातील विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल १६ हजारांनी वाढली आहे. त्यामुळेच विमा काढलेल्या क्षेत्राची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.

पीक विम्यासाठी आलेले अर्ज

पिकया वर्षी आलेले अर्जगेल्या वर्षी आलेले अर्ज
द्राक्ष९,१५८४,५२२
केळी८२,०५७६२,५५९
काजू११,७९६१७,८६९
आंबा५६,६३०७७,७३१
मोसंबी८,२०२१५,९७०
संत्रा२,६८०६,६१५
पपई८१५७५९
डाळिंब१,७९१४५,१८९

स्ट्रॉबेरी पिकामध्ये एकही अर्ज नाही.

फळबाग लागवड केली नसताना विमा काढणे, फळबाग उत्पादनक्षम वयाची नसताना विमा काढणे, कमी क्षेत्रावर फळबाग लागवड असताना जास्त क्षेत्रावर विमा घेणे, इतर शेतकऱ्याच्या शेतावर विमा घेणे, असे प्रकार निदर्शनास आले आहेत. असे अर्ज रद्द करण्यात आले असून, त्यांचा विमा हप्ता जप्त करण्यात येतो. तसेच संबंधितांवर कारवाई होऊ शकते. मृग बहारात हजारो अर्ज रद्द करण्यात आले आहेत. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी

टॅग्स :पीक विमाफळेफलोत्पादनपीकशेतीसरकारी योजनासरकारराज्य सरकारकेळीजळगाव