Join us
Daily Top 2Weekly Top 5

Fake Seeds बोगस बियाण्यांनी मोडली कंबर; दोन एकर क्षेत्रावरील वालाला शेंगाच लागेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:43 IST

सावरगाव येथील शेतकऱ्यांने वालाच्या शेंगा लागवडीसाठी बियाणे खरेदी करून दोन एकर लागवड केली. पण बियाणे बोगस असल्यामुळे झाडांना शेंगा लागल्या नाही.

दत्तात्रय पवार 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सावरगाव येथील शेतकऱ्यांने वालाच्या शेंगा लागवडीसाठी बियाणे खरेदी करून दोन एकर लागवड केली. पण बियाणे बोगस असल्यामुळे झाडांना शेंगा लागल्या नाही.

आता या बियाणे संबधित अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन उडवाउडवीची उत्तरे देत काढता पाय घेतला. अखेर यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांने योग्य न्याय मिळावा व संबंधितावर कार्यवाही व्हावी यासाठी कन्नड पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे.

शेतकरी रावसाहेब गणपत निकम यांनी कन्नड येथील चेतन शेती साहित्य या बि-बियाणे विक्री कृषी सेवा केंद्रातुन (दि.१३) मार्च २०२४  रोजिला अंकुर-१८३ या वाणाचे 'वाल' बियाणे खरेदी केले होते. ज्याची निकम यांनी सावरगाव येथील आपल्या मालकीच्या गट नं. ८२ व ८३ शेतात दोन एकर क्षेत्रात १७ मार्च रोजी लागवड केली.

बि-बियाणे, कीड व्यवस्थापनासाठी महागडे किटक नाशकाची फवारणी, रासायनिक खते, मशागत अस सर्व व्यवस्थापन करत चार, साडेचार महिने उलटले. झाडे हिरवी गार बहरली. मात्र झाडांना शेंगाच लागल्या नाही. शेतकरी रावसाहेब निकम यांनी संबंधित दुकानार व कंपनीचे अधिकारी मंगेश जाधव व दिंडे सह एरिया मॅनेजर यांना कळविले. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी पाहणी करत केवळ उडवाउडवीची उत्तरे देत काढता पाय घेतला. यानंतर मात्र बि-बियाणे कंपनी मुख्य कार्यालय नागपूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही तक्रारी कडे दुर्लक्ष केले.

शेतकऱ्यांस बोगस बियाणे मुळे आपली फसवणूक झाली असून आपले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी रावसाहेब निकम यांनी कन्नड पंचायत समिती संबंधित कृषी अधिकारी (दि. १८) जुलै रोजी लेखी तक्रार दाखल केली. मला योग्य न्याय मिळावा व संबंधितावर कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रकन्नडमराठवाडाशेतकरी