Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोफत दिल्या जाणाऱ्या सोयाबीन बियाण्याच्या बॅगेमध्ये ३ किलो बियाणे कमी; काय आहे विषय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:18 IST

Soybean Biyane खरीप पेरणीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीनचे मोफत बियाणे दिले जात आहे. एक हेक्टरच्या मर्यादेत ७५ किलो बियाणे प्रति लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत आहे.

अहिल्यानगर : खरीप पेरणीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीनचे मोफत बियाणे दिले जात आहे. एक हेक्टरच्या मर्यादेत ७५ किलो बियाणे प्रति लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत आहे.

मात्र मोफत दिल्या जाणाऱ्या सोयाबीन बियाणांच्या प्रत्येक बॅगेमध्ये ३ किलो बियाणे कमी येत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात कृषी विभागाला २ हजार २९३ क्विंटल सोयाबीन बियाणे वाटपाचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी कमी खर्चात व काही बियाणे मोफत उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी विभागाकडून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते.

त्यात तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांची बियाणे अनुदान तत्त्वावर दिले जातात. तर सोयाबीनचे बियाणे मोफत दिले जाते. महाबीजकडून बियाणांचा पुरवठा केला जात आहे.

सध्या मोफत असलेले सोयाबीन बियाणे घेण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरून निवड झालेल्या शेतकऱ्यांना सध्या सोयाबीन बियाणाचे वाटप होत आहे.

एक हेक्टरसाठी ७५ किलो बियाणे मिळणे अपेक्षित आहे. मात्र कंपनीकडून २२ किलो बियाणांची बॅग बनविली असून ३ बॅग दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रति बॅग ३ किलोप्रमाणे ९ किलो बियाणे कमी मिळत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.

शासनाच्या या धोरणावर शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर कृषी विभागाने दोन-तीन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बियाणे घेण्याचे अवाहन केले आहे.

बियाणांच्या बॅगवर क्यूआर कोडमहाबीजचे सर्व प्रमाणित बियाणे साथी पोर्टलमधून नोंदणी केलेले आहे. बियाणाच्या प्रत्येक बॅगवर साथी पोर्टलचा क्यूआर कोड आहे.हा कोड स्कॅन केल्यानंतर बियाणांसाठी वापरलेले स्त्रोत, बियाणे कोठून मिळाले, उत्पादन व प्रक्रिया कुठे झाली आहे, तपासणी लॅब रिपोर्ट आर्दीची माहिती मिळणार आहे, असे महाबीजचे व्यवस्थापक सुनील फिरके यांनी सांगितले.

५० टक्के अनुदानावर मिळते बियाणेतूर १४५ रुपये प्रति किलो, मूग १४० रुपये प्रति किलो, उडीद १३५ प्रति किलो दर असणार आहे. ५० टक्के अनुदानायर हे बियाणे मिळत आहेत. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत सोयाबीन पिकासाठी विविध वाणाचे बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध होत आहे.

कृषी विभागाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी-जास्त असते. त्यामुळे कोणत्याही साईजमध्ये बियाणांची पॅकिंग केली तरी वाटप करताना अडचण येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे घेताना एकत्रित बियाणे घेतले पाहिजे. दुकानदारांना नियमाप्रमाणे बियाणे वाटप करण्यास सांगितले आहे. बियाणे शिल्लक राहिले तरी पुढच्या यादीतील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. - सुनील फिरके, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

महाडीबीटी पोर्टलवर सोयाबीनच्या बियाणांसाठी मेसेज आल्यानंतर कागदपत्रे घेऊन दुकानदाराकडे गेलो असता त्यांनी २२ किलोच्या तीन बेंग दिल्या. परंतु नियमाप्रमाणे एक हेक्टरसाठी ७५ किलो बियाणे मिळणे अपेक्षित होते. ९ किलो कमी मिळाल्याने उर्वरित बियाणे खरेदी करावे लागेल. - संदीप ढाले, शेतकरी, सोनई, ता. नेवासा

अधिक वाचा: अकोला कृषी विद्यापीठाचा सोयाबीनचा हा वाण अल्पावधीतच लोकप्रिय; देतोय सर्वाधिक उत्पादन

टॅग्स :सोयाबीनशेतीशेतकरीपीकराज्य सरकारकृषी योजनामहाबीजखरीप