Join us

e Pik Pahani : पीक पाहणी झाली आता सोपी; मोबाईल अ‍ॅपमध्ये केले 'हे' बदल, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 09:48 IST

e pik pahani सध्या सबंध राज्यभर खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी सुरू असून, आतापर्यंत ९ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद झाली आहे.

पुणे : सध्या सबंध राज्यभर खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी सुरू असून, आतापर्यंत ९ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद झाली आहे.

गेल्या उन्हाळी हंगामात ही नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतातील फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवडीपासून ५० मीटरची अट आता २० मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक लागवडीची अचूक माहिती मिळणार आहे.

तसेच अ‍ॅपवर नोंदणी करताना पूर्वी वारंवार ओटीपी द्यावा लागत होता. आता एकदाच ओटीपी टाकावा लागणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

भूमी अभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करण्याासाठी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) या मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शेतकरी स्तरावरील ही नोंदणी एक ऑगस्टपासून भरण्यास सुरुवात केली असून अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे.

अचूकता मर्यादा वाढली◼️ गेल्या वर्षी उन्हाळी हंगामात या अ‍ॅपद्वारेच पिकांची नोंदणी केली होती.◼️ तेव्हा पिकाचा फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवड केलेल्या क्षेत्राच्या ५० मीटरच्या आतील फोटो अ‍ॅपकडून स्वीकारला जात होता.◼️ आता यात बदल केला. ही मर्यादा आता २० मीटर इतकी करण्यात आली आहे.◼️ त्यामुळे पीक नोंदणी करताना अधिक अचूकता येणार असल्याची माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.

एकदाच ओटीपी टाकून नोंदणी होईल पूर्ण◼️ यापूर्वी नोंदणी करताना मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी अनेकदा टाकावा लागत होता.◼️ आता एकदाच ओटीपी टाकून नोंदणी पूर्ण करता येईल.◼️ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर माहितीतील दुरुस्ती करण्यासाठी पुढील ४८ तासांची मुभा दिली आहे.◼️ तसेच नोंदणी करताना इंटरनेट नसले तरी ती अपलोड करता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सर्वाधिक पिकांची नोंदणी कोणत्या विभागात?◼️ राज्यात आतापर्यंत ९ लाख ५७ हजार १७७ शेतकऱ्यांनी ९ लाख २ हजार ८३० हेक्टरवरील पिकांची नोंद या अ‍ॅपच्या माध्यमातून केली आहे.◼️ सर्वाधिक २ लाख ५० हजार ७१६ हेक्टरवरील पिकांची नोंदणी संभाजीनगर विभागात झाली आहे.◼️ कृषी विभागाने यंदा १ जूनपासून पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक केली आहे.

विभागनिहाय नोंदणीविभाग - नोंदणी केलेले शेतकरी - क्षेत्र (हेक्टर)अमरावती - १,४३,२६० - १,८१,८५५.९२कोकण - ४४,४१४ - २८,२६७.०५संभाजीनगर - २,७३,४३५ - २,५०,७१६.१९नागपूर - १,८९,३४५ - १,७१,६०६.१२नाशिक - १,७०,४७४ - १,६१,५४५.०९पुणे - १,३६,२३९ - १,०८,८३९.६३एकूण - ९,५७,१७७ - २,०२,८३०

अधिक वाचा: शेत व पाणंद रस्ते मजबुतीकरणासाठी अजून एक शासन निर्णय निर्गमित; काय आहे निर्णय?

टॅग्स :शेतीशेतकरीपीकमहसूल विभागमराठवाडा