चंद्रकांत गायकवाडआईच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात भावनिक आणि संस्कारशील निर्णय घेत श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथील कृषी संशोधक उद्धवराव शिरसाट यांनी पारंपरिक शेतजमिनीचा हिस्सा शेतीत राबणाऱ्या भावांच्या नावावर केला.
कौटुंबिक स्नेह, कृतज्ञता आणि सामाजिक प्रबोधनाचा वस्तुपाठ घालून दिला. यावेळी उपस्थितांसाठी हा सोहळा केवळ आनंदाचा नव्हे तर भावनिक ऋणनिर्देश आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत अनुभव ठरला. ग. भा. वत्सलाबाई माणिकराव शिरसाट यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा नुकताच त्यांच्या ८१ व्या वर्षी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
नवीन साडी-चोळी, दागिने, सप्तधान्यांची तुळा अशा विविध परंपरेसह सर्व आप्तस्वकीय, सगेसोयरे, ग्रामस्थ यांच्या उपस्थिती हा सोहळा पार पडला.
पंढरीचे नित्य वारकरी आणि सडेतोड परिश्रमशील स्वभावाचे दिवंगत माणिकराव शिरसाट यांना तीन अपत्ये आहेत. ज्यात मधुकर, उद्धव आणि दिव्यांग मीरा. आपल्या सव्वातीन एकर कोरडवाहू जमिनीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत त्यांनी मुलांना खंबीर केले.
त्यांच्या पश्चात मोठे बंधू मधुकर यांनी कोळसांगवी येथे सालगडी म्हणून काम करत लहान भावाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्यातून उद्धव यांना कृषीशास्त्रात उच्च शिक्षण घेता आले आणि ते कृषी संशोधक झाले. पुढे त्यांनी विविध देशांमध्ये आधुनिक शेतीचे धडे दिले.
कुटुंबाच्या उभारीसाठी योगदान दिल्यानंतर उद्धव शिरसाट यांनी आईच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्य साधून शेतीत राबणाऱ्या भावांच्या नावावर जमीन हिस्सा करून देत एक आगळावेगळा आदर्श उभा केला. या निर्णयाने उपस्थितांची डोळे पाणावले हेही विशेष.
यावेळी सोहळ्यात कीर्तनकार अतुल महाराज शास्त्री यांनी मातृऋणाची महती विशद करणारे प्रभावी कीर्तन सादर केले. तर आभारप्रसंगी संशोधक उद्धवराव शिरसाट यांनी आपल्या जीवनप्रवासाचा थोडक्यात आढावा सांगत कुटुंबाच्या त्यागामुळेच आजचा दिवस शक्य झाल्याची भावनिक कबुली दिली.
तसेच मोलमजुरी करून आईवडीलांनी वाढविले. मोठ्या भावाने सालगडी म्हणून काम करत आर्थिक हातभार लावला. त्यामुळे शिक्षण होऊ शकले. आज सर्व काही आहे ते यांच्यामुळेच.
त्यामुळे उतराई होण्याची भावना आणि नैतिक कर्तव्य म्हणून आईच्या साक्षीने हक्कसोड पत्र करून दिले असे उद्गार देखील उद्धवराव शिरसाट यांनी काढले.
अधिक वाचा: शेत रस्त्यांचे वाद मिटणार; आता रस्त्यांची कायदेशीररीत्या सातबाऱ्यावर 'या' ठिकाणी होणार नोंद