Join us

उत्पादन खर्च वाढल्याने साखरगाठींचा गोडवा शंभरीपार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 1:33 PM

किरकोळ बाजारात सध्या साधारण साखरगाठींचा भाव ८० तर शुभ्र साखरगाठींचा भाव १०० रुपये किलो

अनिल भंडारी

बीड : यंदा दुष्काळजन्य स्थिती आणि वाढत्या तापमानामुळे यंदा चैत्र प्रतिपदा, गुढी पाडव्यासाठी विशेष मान असणाऱ्या साखरगाठींची मागणी निम्म्याने कमी झाली असून उत्पादनातही घट झाली आहे. ठोक व किरकोळ बाजारात मागणी घटल्याने यंदा कारखानदारांना साखरगाठीचा गोडवा कमीच चाखावा लागणार आहे.

शहरातील भोई समाजातील अनेक कुटुंब साखरगाठींचे उत्पादन आणि व्यवसाय अनेक वर्षांपासून करतात. काही कुटुंबांतील तिसरी पिढी या व्यवसायात आहे. श्रमिकांची जुळवाजुळव सोबत साखर, इतर साहित्य, तसेच इंधनाचे नियोजन करून साधारण एक महिने आधीपासून भट्टी पेटते. एका कारखान्यात दररोज तीन ते चार क्विंटल साखरगाठींचे उत्पादन करण्याचे नियोजन असते परंतु, यंदा कारखानदारांनी हे प्रमाण विविध कारणांमुळे कमी केले आहे.

साखरगाठींची शंभरी

बाजारात साखरेचा भाव ३९०० होता, त्यानंतर ४००० रुपयांपर्यंत वाढला आणि काही दिवसांतच पुन्हा ३९०० रुपये क्विंटल राहिला. असे असलेतरी साखरगाठींसाठी लागणारे इंधन, मजुरी, दूध, दोरा, लिंबू व साखर आदी साहित्यावरील खर्च पाहता उत्पादन मूल्य ६० ते ६५ रुपयांच्या घरात जाते. बाजारातील परिस्थितीनुसार दर काढला जातो. किरकोळ बाजारात सध्या साधारण साखरगाठींचा भाव ८० तर शुभ्र साखरगाठींचा भाव १०० रुपये किलो आहे.

सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा

३० पेक्षा जास्त कारखाने

● बीडमध्ये साखरगाठी तयार करणारे ३० पेक्षा जास्त कारखाने आहेत.

● या कारखान्यांतून जवळपास दोनशे ते तीनशे कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

● कारखान्यात भट्टी पेटलेल्या असल्याने प्रचंड उष्णता असते. अशा परिस्थितीत कामगार साखरेचा पाक बनविणे, दोरा लावणे, पाक साच्यात भरणे आणि साखरगाठी होताच काढण्याचे काम सतत सहा ते सात तास करतात.

● काही कारखान्यांत दिवसाचा मजुरीदर ठरविला जातो तर, काही कारखान्यात साखरगाठींच्या उत्पादनावर मजुरी दिली जाते.

यंदा उत्पादन निम्म्यावर

बीडमधील कारखान्यात साखरगाठींचे एक ते दीड टन उत्पादन दरवर्षी केले जाते. यंदा ग्रामीण भागात पाणीटंचाई, शेतमालाला पुरेसा भाव नसल्याने तसेच, सध्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम झाला आहे. बाजारात पैसा फिरत नसल्याने कारखानदारांनाही अंदाज घेत उत्पादन करावे लागत आहे. साखरगाठींचे उत्पादन निम्म्यावर आल्याचे साखरगाठी उत्पादक, विक्रेते पारस कांबळे यांनी सांगितले.

छायाचित्र - संतोष राजपुत 

ठोक बाजारात उठाव कमी

● बीडच्या कारखान्यात तयार झालेल्या साखरगाठीला पुणे, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव जिल्ह्यांसह बारामती, कुंथलगिरी व ग्रामीण भागात मागणी असते; परंतु यंदा त्या भागातील व्यावसायिकांकडूनही उठाव कमी राहिला.

● यंदा होळीलाही साखरहारांची मागणी अत्यंत कमी होती. हौशी ग्राहकही कमी झाले आहेत. अपेक्षेनुसार विक्री होत नसल्याचे कारखानदारांनी सांगितले.

पांढऱ्याशुभ्र साखरगाठी

साखरेच्या पाकावर गाठींचा रंग अवलंबून असतो. पांढऱ्या शुभ्र नऊ मणी, अकरा मणीच्या गाठी तयार केल्या जातात. ज्याचे वजन ९० ग्रॅम ते १८० ग्रॅम मणीच्या आकारानुसार असते. सकाळपासूनच कामाला सुरुवात होते. तापलेल्या भट्टीमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमध्ये तापमानातील उष्णता वाढली आहे. त्यामुळे कामाचा उरकही लवकर होत नाही. घरच्या सदस्यांनाही मजुरांसोबत काम करावे लागते, असे रत्ना सतीश कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :ऊसशेतकरीदुष्काळमराठवाडागुढीपाडवाअक्षय्य तृतीयाशेती