बालय्या स्वामी
"पाऊस पडेल" या आशेवर शेतीचा गाडा हाकत, खिशातील पैसा घालून पेरणी केली; पण पेरलेले स्वप्न उगवलेच नाही! शेवटी नाईलाजाने शेतकऱ्याने आपल्या हातांनी पेरलेल्या पिकावर ट्रॅक्टरचा नांगर फिरवण्याची वेदनादायक वेळ ओढवली. हिंगोली जिल्ह्यातील खुदनापूर (ता. बसमत) येथील शेतकरी भारत किशनराव चव्हाण यांच्या शेतीमातीची ही व्यथा.
भारत चव्हाण यांच्याकडे एकूण पाच एकर शेती असून यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी चार एकर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केली होती. मात्र पेरणीसाठी आवश्यक असा प्रारंभीचा पाऊसच झाला नाही. यामुळे पेरलेले सोयाबीन उगवण्याआधीच करपत गेले.
दरम्यान काही काळ प्रखर उन्हाची तीव्रता इतकी वाढली की जमिनीतील उरलेसुरले ओलही आटून गेली. पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचण्याइतपत ओल नसल्यानं उगमच थांबला. जे काही अंकुरले तेही उन्हाने जळून गेले. परिणामी चव्हाण यांचे चार एकरांवरील संपूर्ण पीक वाया गेले.
पावसावर अवलंबून असलेल्या अशा बळीराजासाठी दुसऱ्यांदा पेरणी करणे हे आर्थिकदृष्ट्या फार कठीण. बी-बियाण्यांचा व खते, औषधांचा खर्च, ट्रॅक्टरचा भाडे, मजुरी आदी सगळ्याचा विचार करता दुबार पेरणी परवडणारी राहिली नव्हती. दुसरीकडे आधीच वाया गेलेल्या पेरणीचे दुःख आणि निसर्गाच्या लहरीपणाची असह्य झालेली झळ यामुळे भारत चव्हाण यांनी अखेर पिकावर नांगर फिरवण्याचा निर्णय घेतला.
चार एकरांवर उगमास येण्याआधीच करपत गेलेल्या सोयाबीनवर ट्रॅक्टरचा नांगर फिरवतानाचा क्षण कुठल्याही शेतकऱ्याच्या काळजात खोल जखमा करेल असा आहे. किंबहुना मेहनतीने पेरलेले, जिवापाड जपलेले आणि आशेवर उभे असलेले पीक स्वतःच नष्ट करताना चव्हाण यांची मन:स्थिती विदारक होती.
आज राज्यभरात अनेक भागांत अशीच स्थिती आहे. अनेक भागांतील शेतकरी कोरड्या पावसामुळे चिंतेत आहेत. काहींनी दुबार पेरणी केली तर काहींनी चव्हाण यांच्यासारखी हतबल मन:स्थिती स्विकारली. या पार्श्वभूमीवर सरकारने अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देणे, भरपाई जाहीर करणे आणि बी-बियाण्यांची सवलतीत उपलब्धता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
कारण निसर्गाच्या लहरीपणापुढे सामान्य शेतकरी हतबल झाला असून, शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला दिलासा देणारी धोरणे आणि निर्णय या टप्प्यावर अत्यावश्यक झाले आहेत. शेती ही नुसती व्यवसाय नाही, ती शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची बाब आहे. पण जर या जिव्हाळ्यावरच दरवर्षी अशा पद्धतीने गदा येत राहिली, तर पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्याच्या मनात आधीच भीतीचे ढग जमू लागतील. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या वेदनांना शासनाने वेळेत प्रतिसाद देणे ही काळाची गरज बनली आहे.