Join us

बीजमाता राहीबाई पोपेरेंची अशी ही दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2023 12:03 PM

बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे कोंभाळणे (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथे निसर्गाची साथ घेत दिवाळी साजरी करतात. बियाणेरूपी दिवा आणि नुकतेच शेतात तयार झालेले बियाणे यांची सुंदर आरास करून त्याची त्या कुटुंबीयांसमवेत पूजा करतात.

राहीबाई पोपेरे, बीजमाताबीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे कोंभाळणे (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथे निसर्गाची साथ घेत दिवाळी साजरी करतात. बियाणेरूपी दिवा आणि नुकतेच शेतात तयार झालेले बियाणे यांची सुंदर आरास करून त्याची त्या कुटुंबीयांसमवेत पूजा करतात. घरावरती तोरणसुद्धा भाताच्या लोंब्यांचे असते. लक्ष्मीपूजनासाठी नागली, वरई, खुरसनी व इतर भाजीपाल्यांचे बियाणे मांडले जाते. सोबत अस्सल गावठी बियाण्यांची मांडणीही पूजेत होते. आपल्या कार्याशी आणि ध्येयाशी एकनिष्ठ राहून प्रत्येक सणवार साजरा करण्याची खासियत राहीबाई जपतात. देशवासीयांना व सीमेवर लढणाऱ्या सैनिकांनाही त्या दिवाळीला शुभेच्छा देतात.

वाघबारस साजरी करून आदिवासी भागात दिवाळी उत्सवाला सुरुवात होते. जोपर्यंत माहेरी आई-वडील तोपर्यंतच सासरवासी महिलेची खरी दिवाळी माहेरी असते. आम्ही सात बहिणी. पूर्वी दर दिवाळीला माहेरी एकत्र येऊन एक-दोन दिवस माहेरी राहून दिवाळी साजरी करायचो. तेव्हा वडील होते. आता सवडीने माहेरी भाऊबीजेला जाऊन येते. काळ बदलला, हे खरे आहे; पण दिवाळी हा नाते जपायचा सण हे विसरून चालणार नाही.

मैत्रिणींसोबत..लहानपणी मैत्रिणी एकत्र रानात फिरून नागलीचा व भाताचा सर्वा गोळा करायचो. पीक कापणीनंतर शेतात चुकूनमाकून शिल्लक राहिलेल्या जमिनीवर पडलेली कणसे, लोंब्या पीका, नागली. भाताच्या लोंब्या करून उखळात कुटायच्या आणि दहा पैसे वा चार आण आठ आणे विकायच्या. त्यातून जमलेल्या पैशांत टिकल्या (फटाका) घ्यायच्या आणि दगडाने फोडत दिवाळीचा आनंद साजरा करायचा.

आदिवासी हे वनपूजा आणि गोपालक असल्याने वाघबारस हा दिवाळीतील मुख्य सण म्हणून साजरा करतात. गुरं राखणारी मुलं वर्गणी काढून गूळ, तांदळाची खीर बनवतात. डोगर खापा शिजविल्या जातात. काही मुले वाघे बनतात त्यांना डॉगर खापा फेकून मारल्या जातात. असा खेळ लहान मुले खेळतात. गायरानात दगड-कड्याला शेंदूर लावून वाघबारस आजही साजरी करतात; पण आता स्वरूप बदलत चालले आहे.

वाघबारसपासून पाच दिवस भाताची तूस, कांडल, लव्हाळी गवताच्या दिवट्या तयार करून गावातील मुलं घरोघरी गाय गोठ्यात जाऊन तेल मागतात. पूर्वी टेंभा पण असायचा. तेव्हा रॉकेलदेखील मागावे लागे. पूर्वी मुलांच्याप्रमाणे मुलीचादेखील गट दिवाळी ओवाळीसाठी गावात फिरायचा. मी देखील अशी मागायला जायचे. आता फक्त मुलेच पणती, दिवटी घेऊन घरोघरी ओवाळी करून दिवाळी साजरी करतात. ही परंपरा आजही जपली जात आहे.

दुष्काळाच्या साली (१९७२) वडिलांनी भात खाचरात शाळू पेरला होता. पीक कापणीला आले अन् रात्रीतून सर्व पिकाचे गोंडे चोरीला गेले. दहा-बारा गोण्या ज्वारी झाली असती. दुष्काळात तेरावा महिना घराने अनुभवला. ऐन दिवाळीत हा प्रसंग घडला होता. त्यामुळे त्यावर्षी आमची दिवाळीच साजरी झाली नाही. शेतकऱ्याची दिवाळी ही जेमतेम असते. रान फुलले तरच त्याची दिवाळी फुलते.

माझी गवळण गाय बरी हो दूध भरून देते चरी.... दिन दिन दिवाळी गाय-म्हशी ओवाळी.... गाय चरते यमुना तिरी तिला राखण कृष्णहरी.... तेल वाढा बडाभडी.... आणा खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठी घालीन काठी.... असे आपल्या बोलीभाषेत गीत गातात. ही प्रथा अजून काही मुलांनी जपली आहे.

शब्दांकन:हेमंत आवारीअकोले, जि. अहमदनगर

टॅग्स :दिवाळी 2023पद्मश्री पुरस्कारशेतकरीशेतीदुष्काळगायभात