जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले (IAS) यांनी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी (नांदेड-II) येथे भेट देऊन केंद्रातील विविध प्रगत उपक्रम, संशोधन व शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सखोल माहिती घेतली.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस प्रात्यक्षिक प्लॉट, स्वयंचलित सिंचन व खत व्यवस्थापन प्रणाली, प्राणी विज्ञान प्रात्यक्षिक युनिट्स, बीज प्रक्रिया व नीम प्रक्रिया युनिट्स, कस्टम हायरिंग सेंटर (CHC), सेंद्रिय शेती उपक्रम, उद्यमिता शिक्षण केंद्र, ड्रोन प्रशिक्षण केंद्र, तेजस्विनी वस्त्र निर्मिती केंद्र तसेच प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.
श्री कर्डीले यांनी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व तज्ज्ञांशी संवाद साधून कृषी नवकल्पना, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांना मिळणारे फायदे व ग्रामीण विकासातील परिणामकारकता यावर सखोल चर्चा केली. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या भेटीदरम्यान त्यांनी जलथरा प्रात्यक्षिकाचे उद्घाटन केले. तसेच तज्ज्ञांकडून ड्रोन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील फवारणी, निरीक्षण व व्यवस्थापन कसे सुलभ होऊ शकते याची माहिती मिळाली.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सौ. क्रांती डोंबे व श्री अनुप पाटील उपस्थित होते. तसेच सगरोळी, हस्नाळ व रवंगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून आपले अनुभव व अपेक्षा मांडल्या.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांची ही भेट शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीला चालना, उत्पादनक्षमता वाढ व ग्रामीण प्रगती साध्य करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
