Disease On Turmeric : परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात हळद (Turmeric) काढणीला सुरुवात झाली असून, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा फटका पिकाला बसला आहे. त्यात कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट येत असल्याची स्थिती आहे.
हळदीच्या (Turmeric) हंगामाला सुरुवात झाली असून, काढणीला वेग आला आहे.तालुक्यातील वालूर, मोरेगाव, हतनूर, रवळगाव, गुगळी धामणगाव, राव्हा, कुपटा, आडगाव, हट्टा शिवारात हळद पीक घेतात.
'कोचा'ला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हळदीसाठी केलेला खर्च कोचाच्या विक्रीतून निघण्यासाठी थोडी मदत होत आहे. बाजारपेठेत हळदीला मागणी वाढल्याने हळदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हळदीच्या दराने गेल्या सात वर्षातील उच्चांक गाठला आहे. मागील काही वर्षात हळदीला ५ ते ६ हजार रुपये दर मिळाला होता. (Turmeric Market)
मात्र, यंदा प्रथमच १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे हळदीबरोबर कोचाचे सुद्धा भाव वाढले आहेत. मागील वर्षात कोचा ५० ते ६० रुपये प्रति किलोने विकला गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमधून सद्यस्थितीत समाधान व्यक्त होत असले, तरी शेतमाल बाजारात येताच दर घसरतात, हे चित्र अनेक वर्षांपासून बाजारपेठेत दिसून येते. (Turmeric Market)
उत्पादनामध्ये १५ टक्के घट होण्याचा अंदाज
* देशात २०२३-२४ मध्ये ३ लाख ५ हजार १८२ हेक्टरवर हळदीची लागवड होती. त्यात ११ लाख ८० हजार टन उत्पादन झाले होते. सध्या ते घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
* कारण हळद पिकावर करपा व कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळदीच्या उत्पादनामध्ये १५ टक्के घट होईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
* हळद लागवड करताना त्यासाठी बियाणं म्हणून कच्च्या हळदीचा उपयोग केला जातो. हळद काढणी करताना त्याच बियाणाची जी हळद निघते तिला 'कोचा' म्हणतात. एकरी दहा ते पंधरा किलोपर्यंत कोचा मिळतो. या हळदीला मोठी मागणी असते.
कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करा उपाय
* कंदकूज रोग होण्यापूर्वी कॉपर ऑक्सिक्लोराइड ४५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करा.
* रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटॅलॅक्सिल + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) ४५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करा.
कोचाला १५० रुपये किलोपर्यंत भाव
यंदा कोचाला १०० ते १५० रुपये किलोचा दर मिळत आहे. हळदीचा कोचा आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने त्याला वैद्यकीय क्षेत्रात मोठी मागणी आहे. त्याचा उपयोग कुंकू बनविण्यासाठीही केला जातो.
यंदाच्या हंगामात हळद विक्रीस येऊ लागली आहे. हंगामाच्या सुरुवातीला दर चांगले असून, येत्या १५ दिवसात हळदीची आवक वाढेल. - पिंटू रेवणवार, हळद व्यापारी, वालूर
हे ही वाचा सविस्तर : Ginger Crop: अद्रक पिकाचे आर्थिकगणित काय असते ते जाणून घ्या सविस्तर