Join us

ट्रॅक्टर, हरितगृह, कांदाचाळीसाठी अर्ज केला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:44 IST

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२३-२४ साठी कृषी विभागाला निधी प्राप्त झाला असून यातून शेतकऱ्यांना हरितगृह, शेडनेट हाउस, कांदा चाळ, पॅक हाउस आदी योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, त्यातून चांगले उत्पादन निघावे, पर्यायाने शेतकरी आर्थिक समृद्ध व्हावा, या उद्देशाने शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ११ लाख रुपये, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ११.९२ लाख रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार कृषी विभागाच्या वतीने विविध आहे. योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येणार?

फूलपीक लागवड, मशरूम उत्पादन, हरितगृह, शेडनेट हाउस, प्लॅस्टिक मल्चिंग, ट्रॅक्टर २० एचपी, शेतकरी अभ्यास दौरा, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदा चाळ, पॅक हाउस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र या योजनांचा लाभ घेता येणार यासाठी शेतकऱ्यांनी मुदतीत व विहीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.

कागदपत्रे कोणती?

या योजनेसाठी सातबारा, होल्डिंग (आठ-अ), बँक पासबुक, आधार कार्ड लिंक असलेला मोबाइल सोबत असणे आवश्यक आहे.

शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्ज सादर करावा. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा. - शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली

कोठे करणार अर्ज ?

शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login संकेतस्थळास भेट द्यावी. त्यानंतर शेतकरी योजना या सदराखाली नोंदणी करावी.

शेतकरी स्वतःचा मोबाइल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र आदीच्या माध्यमातून महाडीबीटीच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

टॅग्स :शेतकरीसरकारी योजनाकांदा