Join us

कृषी विज्ञान केंद्र कडून राबवले जाणार 'विकसित कृषी संकल्प अभियान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 09:34 IST

देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक मार्गदर्शन आणि शेतीतील नवकल्पना पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या उपक्रमाचा शुभारंभ येत्या २९ मेपासून होणार असून हा उपक्रम कृषि विज्ञान केंद्र मार्फत प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक मार्गदर्शन आणि शेतीतील नवकल्पना पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या उपक्रमाचा शुभारंभ येत्या २९ मेपासून होणार असून हा उपक्रम कृषि विज्ञान केंद्र बदनापूर मार्फत जालना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

नुकतेच दिल्ली येथील पुसा कॅम्पसमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय खरीप परिषद-२०२५ मध्ये केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अभियानाची अधिकृत घोषणा केली. यावेळी देशातील विविध राज्यांचे कृषी मंत्री, शास्त्रज्ञ, कृषी सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत देशभरातील १६ हजार वैज्ञानिकांचे ४ जणांच्या चमूंमध्ये गट तयार करण्यात येणार असून हे चमू गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना पीक उत्पादनातील आधुनिक पद्धती, नवीन बियाण्यांचे फायदे, जमिनीचे आरोग्य, पाण्याचे व्यवस्थापन आणि हवामान सुसंगत शेतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचा दुसरा टप्पा येत्या ऑक्टोबरमध्ये रब्बी हंगामासाठी राबविण्यात येणार आहे.

कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथील अधिकारी व शास्त्रज्ञ हे अभियान स्थानिक स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी सज्ज झाले असून शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक माहिती थेट त्यांच्या शेतात पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, खर्चात बचत करणे आणि शेती अधिक फायदेशीर बनवणे हे प्रमुख उद्दिष्ट ठरणार आहे.

तसेच शेतीतील नवीन वाणांची ओळख ज्यात विशेषतः २० दिवसांपूर्वी तयार होणाऱ्या आणि मीथेन उत्सर्जन कमी करणाऱ्या तांदळाच्या वाणांबाबतची माहिती, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावरही या अभियानात भर दिला जाणार आहे. सदरील अभियान 'शेतकऱ्यांच्या दारी विज्ञान' या संकल्पनेवर आधारित असून कृषी शाश्वती आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे असा विश्वास कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे प्रमुख अधिकारी व स्थानिक कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : शेत-बांध संवर्धनातून मिळवा शेजाऱ्यांच्या वादांपासून कायमची सुटका अन् वार्षिक हमखास आर्थिक नफा

टॅग्स :शेती क्षेत्रशिवराज सिंह चौहानजालनामराठवाडाशेतकरीशेती