Join us

करमाळ्यात केळी संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कृषीमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:13 IST

करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेले केळी पिकाखालील क्षेत्राचा विचार करता तालुक्यात केळी संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे.

करमाळा : शेलगाव (वां) ता. करमाळा येथे केळी संशोधन केंद्र, ऊती संवर्धन प्रयोगशाळा व केळी प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मंजुरी मिळावी अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे. 

करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेले केळी पिकाखालील क्षेत्राचा विचार करता तालुक्यात केळी संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे.

तालुक्यातून मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम केळीचे उत्पादन होऊन आखाती देशाबरोबरच युरोपियन देशमध्येही केळीची निर्यात होत आहे. तालुक्यात कोल्ड स्टोअरेज पॅक हाऊसची संख्या नऊ तर साठवण क्षमता २५ हजार मे. टन आहे.

तालुक्यामध्ये सन २०२१-२२ मध्ये ६७३१ हेक्टर व सन २०२२-२३ मध्ये ६९७८ हेक्टर व सन २०२३-२४ मध्ये ७३०० हेक्टर एवढ्या क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केल्याचे कृषी विभागाकडे नमूद असून सरासरी उत्पादकता ६९ टन प्रति हेक्टर आहे.

तालुक्यात कोल्ड स्टोरेज व पॅक हाउसची संख्या ०९ इतकी असून त्याची साठवण क्षमता २५००० मे. टन आहे. तालुक्यातून कंदर, वाशिंबे, वरकटणे, जेऊर येथून ८००० कंटेनरमधून १,६०,००० मे. टन वजनाच्या केळीची निर्यात झाली आहे.

केळीवर प्रक्रिया करून वेफर्ससह इतर उत्पादन घेतले जाते. परंतु कुशल मजुरासाठी प्रशिक्षण, मृदा व जलपरीक्षण केंद्र, खत तपासणी प्रयोगशाळा, नवनवीन वाणाची निर्मिती व दर्जेदार रोपांची निर्मिती यासाठी केळी संशोधन केंद्राची व संवर्धन प्रयोगशाळेची आवश्यकता आहे.

अधिक वाचा: Us Galap : कारखान्यांसमोर ऊस गाळपाचे मोठे आव्हान; द्यावा लागणार जादा दर

टॅग्स :केळीपीकसोलापूरमंत्रीसरकारराज्य सरकारशेतकरीशेती