Join us

राज्यातील खत विक्रेत्यांचा निर्णय; लिंकिंग नाही तेच खत खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 18:12 IST

Fertilizer Linking : राज्यातील खत विक्रेत्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही खत कंपन्या खत विक्रेत्यांना लिंकिंग करत आहेत. म्हणजेच एखादे खत विकत घ्यायचे असेल तर त्याबरोबर दुसरे खतही सक्तीने घ्यावे लागते अशा प्रकारची अट त्या कंपन्या घालत होत्या ज्यास 'लिंकिंग' असे म्हणतात.

राज्यातील खत विक्रेत्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही खत कंपन्या खत विक्रेत्यांना लिंकिंग करत आहेत. म्हणजेच एखादे खत विकत घ्यायचे असेल तर त्याबरोबर दुसरे खतही सक्तीने घ्यावे लागते अशा प्रकारची अट त्या कंपन्या घालत होत्या ज्यास 'लिंकिंग' असे म्हणतात.

या प्रकारामुळे विक्रेत्यांना अडचण होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व खत विक्रेत्यांच्या संघटनेची शनिवारी (३ मे २०२५) एक ऑनलाइन बैठक झाली. बैठकीत सर्व विक्रेत्यांनी एकमताने निर्णय घेतला की, लिंकिंग न करणाऱ्या कंपन्यांकडूनच खत खरेदी केली जाईल.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच अशा कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण जर अजूनही कंपन्यांनी लिंकिंग केल्यास, विक्रेतेच कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करतील असा ठराव बैठकीत करण्यात आला. या निर्णयानंतर शनिवारी दुपारीपासून लिंकिंग न करणाऱ्या कंपन्यांकडूनच खत खरेदी सुरू करण्यात आली.

८० लाखांची खरेदी ठप्प

कोल्हापूर जिल्ह्यात साधारणपणे दोन हजार खत, बी-बियाणे विक्रीचे परवानाधारक विक्रेते आहेत. त्यातील सातशे केवळ खतांची विक्री करतात. खत विक्रेत्यांनी खरेदी बंदचा निर्णय गुरुवारपासून घेतला. गेल्या दोन दिवसांत जवळपास ८० लाखांची खरेदी ठप्प झाली.

राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयानुसार खत खरेदी सुरू केली आहे. लिंकिंग नाही तेच खत खरेदी करून शेतकऱ्यांना दिले जाईल. - विनोद पाटील, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ खते, बी-बियाणे विक्रेते.

मंगळवारी बैठक

लिंकिंग करणाऱ्या खत कंपन्यांवर स्थानिक पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे. मंगळवारी किंवा बुधवारी ही बैठक होणार आहे.

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :खतेशेती क्षेत्रशेतकरीशेतीमहाराष्ट्रमाणिकराव कोकाटे