Join us

Custard Apple Pulp Making : मोरेवाडीत सिताफळ प्रक्रिया केंद्र सुरु ; आता बारमाही चाखता येणार गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:54 IST

बालाघाटच्या सीताफळांचा स्वाद बारमाही चाखता येणे आता शक्य झाले आहे. बीड जिल्ह्यातील मोरेवाडी येथे सिताफळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. यातून महिलांना रोजागराचे साधन मिळाले आहे. (Custard Apple Pulp Making)

Custard Apple Pulp Making :

अनिल महाजन

धारूर : बालाघाटच्या सीताफळांचा स्वाद बारमाही चाखता येणे आता शक्य झाले आहे.  बीड जिल्ह्यातील मोरेवाडी येथे सिताफळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. सामाजिक संस्था सेवा इंटरनॅशनल, दिल्ली आणि ओरेकल इंडिया यांच्या पुढाकारातून सीताफळ प्रक्रियेच्या उद्योगाला बीड जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली आहे. सीताफळ प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सुरू केलेल्या बालाघाटच्या डोंगर रांगेतील नैसर्गिक गोडव्याला योग्य दरही मिळणार आहे.

स्थलांतर रोखत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी सृजन ॲग्रोटेक उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे सीताफळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे.  येथे सीताफळ गर (पल्प) निर्मिती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरी भागात बाराही महिने सीताफळाची चव चाखता येणार आहे.

सामाजिक संस्था सेवा इंटरनॅशनल, दिल्ली यांच्या वतीने आणि ओरॅकल इंडियाच्या आर्थिक सहकार्यातून शेतकरी कुटुंबातील महिलांच्या कौशल्य विकासासाठी आणि उपजीविकेसाठी लघु उद्योगातून रोजगार निर्मितीसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम राबवत आहे.

या प्रक्रिया उद्योगात केज, धारूर आणि अंबाजोगाई येथील ३ महिला बचत गटातील महिला काम करत आहेत. बचत गटातील महिला सीताफळ संकलन करून त्यावर प्रक्रिया करतात. या माध्यमातून जवळपास ७० महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. भविष्यात गर निर्मितीबरोबरच विविध पदार्थांची निर्मिती केला जाणार आहे.

महिला सक्षमीकरणाचा उद्देश

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने धारूर, केज आणि अंबाजोगाई तालुक्यांतील गावातील विविध महिला गटांसोबत काम सुरू केले आहे. स्थलांतर रोखण्याच्या हेतूने अंबाजोगाई, धारूर भागातील डोंगरातून महिला गटांच्या माध्यमातून सीताफळ संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. या पल्पनिर्मिती प्रकल्पाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर महिला गट सदस्यांच्या हस्ते करून उद्योगास सुरुवात केली आहे.  - वैजनाथ इंगोले, कार्यक्रम समन्वयक

सीताफळाचा गर दीड वर्षे साठवता येतो

सीताफळांचा गर हा दीड वर्षे साठवून ठेवता येतो. तो दीड वर्षापर्यंत खराब होत नाही. सीताफळ वर्षातून एकदा येत असले तरी त्यापासून तयार झालेल्या पदार्थाची चव मात्र बाराही महिने चाखता येईल. -  सुरेखा कुंडगर, अध्यक्ष, अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट

या पदार्थांची होते निर्मिती

सीताफळाचा गर काढून त्यावर प्रक्रिया करून कुल्फी, जेली, रबडी, आईस्क्रीम, शेक आदी पदार्थ तयार करण्याचे नियोजन आहे.

येथे होते गराची विक्री

महिला बचत गटाने आतापर्यंत लातूर, पुणे आणि अंबाजोगाई येथे सीताफळ गराची विक्री केली आहे.  

टॅग्स :शेती क्षेत्रफळेमहिलाशेतकरीशेतीसरकारी योजनाबीड