Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आता स्वतःचा ब्रँड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2023 09:04 IST

पुरंदर तालुका बीज गुणन केंद्राचे रूपांतर तालुका फळ रोपवाटिका व संशोधन केंद्रात झाल्याने सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीताफळ इस्टेट उभारणीसाठीचे पहिले पाऊल टाकले आहे. सीताफळ इस्टेट आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीमुळे पुरंदरच्या सीताफळात भौगोलिक मानांकन (जीआय) मिळणार आहे.

पुरंदर तालुका बीज गुणन केंद्राचे रूपांतर तालुका फळ रोपवाटिका व संशोधन केंद्रात झाल्याने सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीताफळ इस्टेट उभारणीसाठीचे पहिले पाऊल टाकले आहे. सीताफळ इस्टेट आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीमुळे पुरंदरच्या सीताफळात भौगोलिक मानांकन (जीआय) मिळणार असून, यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीपासून ते प्रक्रिया उद्योग आणि निर्यात करून चांगल्या आणि वाढीव बाजारभावाचा फायदा होणार असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.

सासवड येथे तालुका कृषी अधिकारी आणि सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थित पत्रकार परिषद झाली. याप्रसंगी आमदार संजय जगताप तसेच तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी ही माहिती दिली. फळ रोपवाटिकेला मान्यता मिळाल्याने शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत पुरंदरमध्ये मध्यवर्ती सीताफळ इस्टेट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आमदार संजय जगताप यांनी आभार मानले, याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक राजेश इंदलकर, सेवानिवृत्त कृषी अधिकारी संभाजीराव गरूड, सीताफळ उत्पादक शेतकरी प्रकाश पवार, विलास जगताप, आबासाहेब कोंढाळकर, काका कामथे, बाळासाहेब पोमण, विलास कडलग, समीर काळे आदी उपस्थित होते.

कृषी विभागाच्या दिवे येथील बीजगुणन केंद्राचे रूपांतर तालुका फळ रोपवाटिकेत झाले आहे. याठिकाणी सीताफळ, अंजीर, चिंच, लिंबू, आंबा, पेरू आणि जांभूळ या फळझाडांचे मातृवृक्ष लागवड, शेततळे, सिंचन व्यवस्थेसाठी ही संकल्पना सुरू करण्यासाठी आमदार फंडातून २० लाख रुपये देणार असून, यामुळे जूनपर्यंत शेतकऱ्यांना फळझाडांची कलमे मिळण्याची व्यवस्था होणार असल्याचे कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी सांगितले. यासाठी दोन कोटींचा खर्च होणार असल्याचेही जाधव म्हणाले.

पुरंदर तालुक्यात २ हजार २०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सीताफळ लागवड असून, येथील फळास विशेष मधुर चव आहे. मध्यवर्ती सीताफळ इस्टेटमुळे पुरंदरच्या सीताफळाला अंजिराप्रमाणे भौगोलिक मानांकन (जीआय) मिळणार असून, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक सीताफळ उत्पादकाला स्वतःचा ब्रँड मिळणार आहे.

सीताफळ इस्टेटमुळे फायदाफळ रोपवाटिकेचे रूपांतर सीताफळ इस्टेट झाल्यावर नुकतेच पुरंदरच्या अंजिराला मिळालेल्या भौगोलिक मानांकनामुळे (जीआय) अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना अनेक फायदे झाले आहेत. त्याप्रमाणे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना कलम लागवडीपासून ते फळांची प्रतवारी, पॅकिंग, विक्री, प्रक्रिया, पल्प काढणे त्याची विक्री तसेच निर्यात करण्यापर्यंत शाश्वत आणि अधिक बाजार भाव मिळून फायदा होणार आहे. राहुरी कृषी विद्यापीठातील संशोधक आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीतील शेतकऱ्यांच्या संशोधनातून अधिक फायदा होईल.

टॅग्स :फलोत्पादनशेतकरीशेतीफळेपीकपुरंदरराज्य सरकारबाजार