Join us

ठेक्याच्या शेतात टरबूज खरबुजाच्या वाड्या; दूधणा प्रकल्प ग्रस्त शेतजमिनिचा असाही वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 3:59 PM

प्रकल्प ग्रस्त जमिनी पाण्याअभावी रिकाम्या झाल्याने तिथे होत आहे टरबूज खरबूजची शेती

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सातोना खु, येथे केदार वाकडी जवळ दुधना प्रकल्प आहे. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा दुधना धरण ७५ टक्के कोरडे पडले आहे. त्यामुळे रिकाम्या झालेल्या मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी ठेक्याने भाड्यावर घेत तेथे १० ते १५ एकर जमिनीत भोई समाजातील शेतकऱ्यांनी टरबूज आणि खरबुजाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

यंदा तालुक्यात दुष्काळाचे सावट असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळाभर उदरनिर्वाह भागविण्यासाठी धरणाचे पाणी जसे जसे खाली गेले, त्या प्रमाणात मापेगाव बु, येथील कानडे या शेतकऱ्याच्या रेवलगाव पुलाजवळील शेतजमिनी उघड्या पडल्या आहेत. आता त्यात १० ते १५ एकर जमिनीत टरबुजांची लागवड करण्यात आली आहे.

यात काही शेतकऱ्यांनी मूळ मालकांच्या जमिनी ठेक्याने पैसे देऊन पीक निघेपर्यंत घेतल्या आहेत. त्यामुळे यात मूळ मालक शेतकऱ्यांसह भोई समाजातील शेतकऱ्यांचाही उदरनिर्वाह भागणार आहे. कडक उन्हाळ्यामध्ये लोक आवडीने टरबूज खाण्याला पसंती देतात. त्यामुळे मागणी वाढते.

टरबूज खाल्ल्याने उष्णतेपासून काही काळ मिळतो आराम

गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड कमी 

• टरबूज आणि खरबूज हे तीन महिन्यांचे पीक आहे. यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. त्याचबरोबर आर्थिक लाभही होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात टरबूज लागवड करण्यात आली आहे.

• आता निम्न दुधना कोरडे पडल्यामुळे या वाड्यांना अल्प पाणी उपलब्ध आहे. 

टॅग्स :फळेमराठवाडाशेतीशेतकरी