Join us

पाण्याच्या कार्यक्षम वापरातून बागायती गव्हाची पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 11:15 AM

रबी हंगामात पाण्याचा कार्यक्षम वापर करून ४ ते ५ पाण्यात गव्हाचे उत्पादन घेता येऊ शकते. त्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत पाण्याच्या पाळ्या देणे, गहू पिकात ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच आच्छादनाचा वापर करून पाण्याची बचत करून कमी पाण्यात जास्त क्षेत्र भिजवून गव्हाचे अधिक उत्पादन घेता येईल.

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात तसेच देशातील काही राज्यात यावर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे रबी हंगामात पाण्याचा कार्यक्षम वापर करून ४ ते ५ पाण्यात गव्हाचे उत्पादन घेता येऊ शकते. त्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत पाण्याच्या पाळ्या देणे, गहू पिकात ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच आच्छादनाचा वापर करून पाण्याची बचत करून कमी पाण्यात जास्त क्षेत्र भिजवून गव्हाचे अधिक उत्पादन घेता येईल. गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय योजना केल्यास गव्हाची उत्पादकता निश्चितपणे वाढेल.

जमीनबागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. तथापि, मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल. शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.

मशागतखरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने १५ ते २० सें.मी. खोलवर नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर १०-१२ टन चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत पसरवून टाकावे.

सुधारित वाण

पेरणीची वेळबागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवाड्यास हेक्टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते व त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.

अधिक वाचा: कोरडवाहू आणि संरक्षित पाण्यावर गहू लागवडीचे नियोजन

बियाणेगव्हाच्या अधिक उत्पादनाकरीता दर हेक्टरी २० ते २२ लाख रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे. ही संख्या मिळविण्यासाठी दर हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे.

बिजप्रक्रियापेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ७५% डब्ल्यु. एस. या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रीया करावी तसेच गहू पिकावरील मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम ७० WP १७.५ मिली प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करुन वियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी. जीवाणू खतांच्या वीजप्रक्रियेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

पेरणीपेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी व वापसा आल्यावर जमीन कुळवावी. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत २० सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोल करावी त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजून न करता ती एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रूंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.

डॉ. सुरेश दोडके, डॉ. योगेश पाटील आणि प्रा. संजय चितोडकरकृषि संशोधन केंद्र, निफाड, जिल्हा, नाशिक

टॅग्स :गहूरब्बीशेतकरीशेतीपेरणीमहाराष्ट्रखतेसेंद्रिय खत