Join us
Daily Top 2Weekly Top 5

निचरा होणाऱ्या जमिनीत कोबीवर्गीय भाज्यांची लागवड; मिळेल चांगले उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:20 IST

हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा करून हे पीक घेणे शक्य आहे. रोपे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य शेतात लावावीत.

निचरा होत असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत कोबीवर्गीय भाज्यांचेपीक घेता येते. हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा करून हे पीक घेणे शक्य आहे. रोपे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य शेतात लावावीत. कोबीच्या गोल्डन एकर, प्राइड ऑफ इंडिया, पुसा ड्रम हेड, कोपन हेगन, गंगा, पुसा सिंथेटिक, श्रीगणेश गोल, हरी राणी, कावेरी बजरंग या सुधारित जातींची लागवड करावी. रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. बी वाफ्यावर रुंदीस समांतर १२ ते १५ सेंटीमीटर अंतरावर ओळीत पातळ पेरावे व मातीने अलगद झाकावे.

हेक्टरी ४०० ते ५०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते. रोपांच्या लागवडीसाठी शेत नांगरून कुळवून, ढेकळे फोडून तयार करावे. रोपांची लागवड सरी वरंब्यावर किंवा सपाट वाफ्यावर करावी. रोपे लागवडीपूर्वी एक टक्का युरियाच्या द्रावणात किंचित काळ बुडवावीत. रोपांची लागवड ४५ बाय ४५ सेंटीमीटर किंवा ६० बाय ६० सेंटीमीटर अंतरावर करावी. या पिकासाठी हेक्टरी २० टन शेणखत, १२० किलो नत्र, ६० किलो स्फूरद व ६० किलो पालाश द्यावे. पूर्ण शेणखत, स्फूरद व पालाश खताची मात्रा, ४० किलो नत्र लागवडीच्या वेळी व उरलेले नत्र दोन ते तीन वेळा समप्रमाणात विभागून द्यावे. लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी रोपांवर एक टक्का युरियाचा पहिला फवारा व ४० दिवसांनी दुसरा फवारा द्यावा.

लागवडीनंतर साधारणपणे २० ते २५ दिवसांनी खुरपणी करावी. खुरपणी करताना रोपांना मातीची भर द्यावी. पुनर्लागवणीनंतर वाढीच्या काळात खालची १ ते २ पाने काढावीत. कोबीच्या पिकाला मावा, हिरव्या अळ्या, गड्डा पोखरणारी अळी, लाल कोळी या किडीपासून व करपा, काळीकूज, क्लम्परॉट या रोगांपासून उपद्रव होतो. त्याकरिता गड्डे धरल्याबरोबर एक मिलीमीटर ५० टक्के मॅलेथिऑन २.५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा झायनेब २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या फवारण्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा कराव्यात. कोबीचा गड्डा पूर्ण तयार झाल्यावर बोटाने दाबल्यास दबत नाही अशावेळी कोबीची काढणी करावी. कोबीचे हेक्टरी २० ते २५ टन उत्पन्न मिळते. थंडीच्या कालावधीचा विचार करून योग्य जातीची निवड करून लागवड करावी. त्याप्रमाणे खतांचा पुरवठा करावा. योग्य मशागतीमुळे उत्पन्न चांगले मिळते. कोबी लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

नवलकोल लागवडकोबीवर्गीय पिकात नवलकोलचा समावेश होतो. नवलकोलच्या गड्यांची चांगली वाढ होण्यासाठी जमीन सुपीक व पाण्याचा निचरा होणारी असावी. रोपे तयार करण्यासाठी ३ बाय १ मीटर आकाराचे १५ सेंटीमीटर उंच गादीवाफे तयार करून ८ ते १० सेंटीमीटर अंतरावर बी पेरावे व बी झाकून पाणी द्यावे. एक हेक्टर लागवडीसाठी नवलकोलचे एक ते दीड किलो बियाणे लागते. बी बारीक असल्याने चाळलेल्या बारीक वाळूत समप्रमाणात मिसळून पेरावे. व्हाइट व्हिएन्ना, पर्पल व्हिएन्ना, पर्पल टॉप, अर्ली व्हाईट, किंग ऑफ मार्केट या प्रचलित जाती आहेत.

टॅग्स :भाज्यापीकशेतीशेतकरी