नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील ४३ हजार ६७९ शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरून पीक संरक्षित केले. दरम्यान, अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले.
मात्र, निकषाच्या कचाट्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अद्यापही रुपयाही आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा २ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांचा पेरा करण्यात आला होता. जून महिन्यापासून मान्सूनच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांना वेळोवेळी पावसाचा फटका बसला होता.
यात ऑक्टोबर महिन्यात वेळोवेळी अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांतील शेती पिकांना फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची स्थिती समजून घेण्यासाठी कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्यांचा अहवाल नोव्हेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आला आहे.
या अहवालावर कारवाईची प्रतीक्षा असताना, दुसरीकडे पीक विमा केलेल्या शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगांची आणि त्यानंतरच्या भरपाईची आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक कापणी प्रयोग झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे विमा परतावा मिळणे दुरापास्त होत असताना शासनाने पूर्वीप्रमाणे एक रुपयात पीक विमा भरण्याची जुनी पीक विमा योजना सुरू करावी. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे निकष ठेवण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून सातत्याने करण्यात येत आहे.
विमा घेऊनही भरपाईविनाच रक्कम वाया जाण्याची भीती
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ४३ हजार ६७९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यातून ४२ हजार ३०१ हेक्टरवरील पीक संरक्षित झाले होते. त्यासाठी २६ कोटी ३८ लाख १० हजारांचा विमा हप्ता भरला होता. नुकसान होऊनही विमा न मिळाल्याने हप्त्याची रक्कम वाया जाणार, अशी भीती आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी बाधित शेतकरी झाले हवालदिल
जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा झाला असला तरीही सहा तालुक्यात वेळोवेळी अतिवृष्टी झाली. खराब हवामानाचा फटका पिकांना बसला. जिल्ह्यातील २ लाख ९२ हजार ५२२ हेक्टर क्षेत्रापैकी ३५ हजारपेक्षा अधिक शेतीपिकांचे ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात नुकसान झाले आहे. हे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तरीही शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील निकष बदलल्याने नुकसानीपोटी भरपाई मिळाली नाही.
बाधितांचा पीक कापणी प्रयोगाने केलाय घात!
नैसर्गिक आपत्ती कोसळली तरी भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष शासनाने ठेवला आहे. त्यामुळे पीक काढणीपूर्वी नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. परिणामी, पीक कापणी प्रयोगाच्या निकषाने शेतकऱ्यांचा घात केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः यंदापासून राज्य शासनाने एक रुपयांत पीक विमा योजना बंद केली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे हप्ता भरावा लागला आहे.
तालुकानिहाय खरीप पीक विमा योजना अशी
• अक्कलकुवा तालुक्यात यंदा ३ १ हजार ६३५, धडगाव ५ हजार ४७७, नंदुरबार २४ हजार ३६२, नवापूर ३ हजार १३४, शहादा ५ हजार ४८१ तर तळोदा तालुक्यातील १ हजार ५९० शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे.
• अक्कलकुवा तालुक्यातील २ हजार ८३९ हेक्टर क्षेत्रासाठी ११ लाख ९३ हजार ७०२ रुपये, धडगाव तालुक्यातील ४ हजार ३१८ हेक्टर क्षेत्रासाठी ११ लाख २२ हजार २९९ रुपये, नंदुरबार तालुक्यातील २५ हजार १७१ हेक्टर क्षेत्रासाठी १८ कोटी २६ लाख ९ हजार ६८, नवापूर तालुक्यातील २ हजार २२९ हेक्टर क्षेत्रासाठी ८ लाख ४५ हजार ७६७, शहादा तालुक्यातील ५ हजार ९५५ हेक्टर क्षेत्रासाठी ३७ लाख २७ हजार ८०६ तळोदा तालुक्यात १ हजार ७८६ हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी ११ लाख ५१ हजार ४६३ हजार रुपयांचा प्रिमियम भरला आहे.
• कुठलीही नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास त्यातून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात आली.
• दरम्यान, बोगस पीकविमा उतरविण्याचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस आल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या हिश्श्यापोटीची विमा हप्त्याची रक्कम पूर्वीप्रमाणे ठेवली. शिवाय, निकषात ही बदल केले. त्यामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
Web Summary : Farmers in Nandurbar faced crop loss due to heavy rains despite paying insurance premiums. Changes in crop insurance norms and delayed crop cutting experiments hindered compensation, causing farmer distress and demands for policy revisions.
Web Summary : नंदुरबार के किसानों को बीमा प्रीमियम भरने के बावजूद भारी बारिश के कारण फसल नुकसान का सामना करना पड़ा। फसल बीमा मानदंडों में बदलाव और फसल कटाई प्रयोगों में देरी से मुआवजे में बाधा आई, जिससे किसानों को संकट और नीति संशोधन की मांग हुई।