Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात पीक विमा रखडला; शेतकर्‍यांना दाद कोणाकडे मागावी हेच कळेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 20:30 IST

खरीप हंगामात पीक विमा भरूनही अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. काहींना मिळतो तर काही ना मिळत नाही, असा अनुभव हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येऊ लागला असून, ज्यांना पीकविमा मिळाला नाही, त्यानी दाद तरी कोणाकडे मागायची? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

खरीप हंगामात पीक विमा भरूनही अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. काहींना मिळतो तर काही ना मिळत नाही, असा अनुभव हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येऊ लागला असून, ज्यांना पीकविमा मिळाला नाही, त्यानी दाद तरी कोणाकडे मागायची? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

मागील काही वर्षांत कधी अत्यल्प पाऊस तर कधी अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भावामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या जात आहे. यंदाच्या खरिपात प्रारंभी अत्यल्प पाऊस आणि त्यानंतर सोयाबीन भरात असताना येलोमोॉकचा प्रादुर्भाव झाला. या किडीमुळे सोयाबीनच्या शेंगा परिपक्व होण्याअगोदरच करपल्या. परिणामी, उत्पादन निम्म्याखाली घसरले. दरवर्षी पिकांवरील संकट पाहता शेतकऱ्यांनी यंदा खरिपात मोठ्या प्रमाणात विमा भरला.

मात्र, हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा भागातील अनेक शेतकरी पीकविमापासून वंचित आहेत. दरवेळेस मोठ्या संख्येने शेतकरी पीकविमा भरतात. हाती मात्र भोपळा येतो. असे प्रकार नेहमीचेच होत आहेत. यावेळेस असाच प्रकार अनुभवास येत असून, काहींच्या हाती पीकविमा आला तर काहींना मात्र डावलण्यात आले. नुकसान झाल्यानंतर तक्रार करून देखील डावलण्यात आल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पीकविमा मिळेल, या आशेवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर पीकविमा भरतात. प्रत्यक्षात मात्र विविध कारणे सांगत शेतकऱ्यांना डावलण्यात येते. सरसगट पीकविमा मिळताना दिसत नाही. कुरुंदा येथे अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत. त्यांच्याकडे विमा भरल्याची पावती असताना देखील विमाची रक्कम मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दाद तरी कोणाकडे मागावी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

यंदाच्या खरिपात पीकविमा भरला होता. नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी, उत्पादनात घट झाली. अशा परिस्थितीत पीकविमाची रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र, पीकविमा मिळाला नाही. - विश्वनाथ कॅनेवार, शेतकरी, कुरुंदापिक विमा योजना

 

सोयाबीन, तूर, कापसाचा विमा भरला होता, तसेच नुकसानीबाबत तक्रारही केली होती. मात्र, अद्याप तरी पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. यावरून संबंधित विमा कंपनी केवळ शेतकऱ्यांचेच पैसे लाटत असल्याचे दिसत आहे. अशा कंपन्यांवर कारवाई करावी. - नारायण अवसरमले, कुरुंदा

यंदा अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. मात्र, त्यांना पीक विमा मिळाला नाही. बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली. मात्र, बहुतांश शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. पीकविम्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. - विष्णू इंगोले, शेतकरी, कुरुंदा

टॅग्स :शेतकरीशेतीसरकारपीक विमापीकमराठवाडा