Pune : रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा भरण्यासाठी आता शेवटचे तीन दिवस बाकी आहेत. रब्बी ज्वारी या पिकासाठी पीक विमा अर्ज करण्याची अंतिम मुदत ही ३० नोव्हेंबर होती तर इतर पिकांसाठी आता केवळ ३ दिवस बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, खरीप २०२३ हंगामापासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पिक विमा योजना लागू केली आहे. याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. चालू रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये पीक विमा योजनेसाठी अर्ज सुरू असून www.pmfby.gov.in या पोर्टलवर जाऊन आपण पीक विम्यासाठी अर्ज करू शकता.
महाराष्ट्रात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे. तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी सदर मुदत ३१ मार्च २०२५ आहे. गतवर्षी रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये विमा योजनेत साधारणता ७१ लाख विमा अर्ज प्राप्त झाले होते. चालू वर्षी दि.११ डिसेंबर २०२४ अखेर राज्यात ४१ लाख विमा अर्ज दाखल झाले आहेत.
पिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांना १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत आहे. राज्य शासनामार्फत या हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना एक रूपयात पिक विमा योजना देऊ केली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाचा विमा उत्तरवावा असे आवाहन करण्यात येत आहे.