Join us

Crop Insurance पेरणीची वेळ आली तरी ७५ टक्के विमा रकमेची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 10:59 AM

विमा कंपनीचा गाडा अडला २५ टक्क्यांवरच

मागील वर्षी शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा भरला होता. दुर्दैवाने दुष्काळ पडला; परंतु विमा कंपनीकडून नुकसानभरपाई म्हणून केवळ २५ टक्के रक्कम मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. बाकी रक्कम केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने खरीप व रब्बी हंगामात पीकविमा केवळ एक रुपया भरून विमा भरण्याची सुविधा निर्माण केली.

यामुळे मागील वर्षी बहुतांशी शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकाचा विमा भरला होता. दुर्दैवाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यात दुष्काळ पडल्याने जिल्हाधिकारी यांनी मागील वर्षीच्या दिवाळीपर्यंत २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते.

मात्र दिवाळी सण झाल्यावर मोजक्याच शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम मिळाली होती.. राहिलेली ७५ टक्के रक्कम पेरणीचे दिवस जवळ आले तरी विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न करता, सतत पुढील तारखा दिल्या जात आहेत. पुढील आठवड्यात नवीन खरिपाचा हंगाम सुरू होणार आहे; परंतु मागील वर्षीची राहिलेली ७५ टक्के विमा रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी ताटकळत बसला आहे.

पेरणी करावी तरी कशी ?

मागील वर्षी दुष्काळाने खरिपापाठोपाठ रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अवस्थेत येणाऱ्या खरीप हंगामासाठी खिशात पैसा नाही. पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. मात्र, विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन विमा रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मागील वर्षीच्या खरीप हंगामातील २५ टक्के रक्कम मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाली होती. राहिलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के रक्कम टाकणे सुरु आहे. - अभिषेक खेडकर, विमा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर.

हेही वाचा - Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग

टॅग्स :पीक विमाशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रमराठवाडा