Join us

कापूस उत्पादकांना आता सीसीआयच्या खरेदीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 12:45 IST

सीसीआयच्या खरेदीमुळे खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन भाववाढीसाठी त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे सीसीआयच्या केंद्राची प्रतीक्षा लागून आहे.

नंदुरबार : दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होणारे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र यंदा कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. सीसीआयच्या खरेदीमुळे खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन भाववाढीसाठी त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे सीसीआयच्या केंद्राची प्रतीक्षा लागून आहे. दरम्यान, नंदुरबार व शहादा येथे केंद्र सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव आहे.

दीड महिन्यापासून कापूस हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. परंतु, भाव नसल्याने साठवणुकीवर भर होता. ही बाब लक्षात घेता गेल्या महिन्यात नंदुरबार बाजार समितीने नेहमीप्रमाणे आपले खरेदी केंद्र सुरू केले. त्याच्या दोन आठवड्यानंतर शहादा बाजार समितीनेदेखील आपले खरेदी केंद्र सुरू केले. शहादा बाजार समितीने प्रथमच कापूस खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांना सोयीचे झाले. या दोन्ही खरेदी केंद्रात बऱ्यापैकी आवक सुरू आहे. आता शेतकऱ्यांना सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राची प्रतीक्षा लागून आहे. सीसीआयने जाहीर केलेल्या संभाव्य खरेदी केंद्रांमध्ये नंदुरबार व शहाद्याचा समावेश केला आहे.

दरवर्षी या दोन्ही ठिकाणी सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे. हे केंद्र सुरू झाल्यास भावाबाबत खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेता लवकरात लवकर सीसीआयचे केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सीसीआयच्या पत्रकानुसार कापसाला सात हजार २० रुपये क्विंटल भाव मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :कापूसनंदुरबारशहादाशेतकरीबाजारमार्केट यार्ड