Join us

Compost Khat: 'कंपोस्ट क्रांती': गावागावांतून उगम होतोय हरित समृद्धीचा! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 10:32 IST

Compost khat: प्रत्येक गावात सेंद्रिय खत तयार होणार आहे आणि स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचे नवे पर्व सुरू झाले आहे. ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या विशेष मोहिमेची सुरुवात १ मेपासून झाली आहे. ही मोहीम केवळ जैविक कचरा व्यवस्थापनापुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या शेतीत 'सेंद्रिय सोनं' पिकवणारी आणि गावागावात हरित परिवर्तन घडवणारी ठरणार आहे. (Compost Khat)

Compost khat: प्रत्येक गावात सेंद्रिय खत तयार होणार आहे आणि स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचे नवे पर्व सुरू झाले आहे. 'कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू' या विशेष मोहिमेची सुरुवात १ मेपासून झाली आहे.(Compost Khat)

ही मोहीम केवळ जैविक कचरा व्यवस्थापनापुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या शेतीत 'सेंद्रिय सोनं' पिकवणारी आणि गावागावात हरित परिवर्तन घडवणारी ठरणार आहे.(Compost Khat)

नागपूर जिल्ह्यात ग्रामपातळीवर जैविक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी 'कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू' ही विशेष मोहीम १ मेपासून सुरू झाली आहे. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत तीन टप्प्यांत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे गावपातळीवर स्वच्छता, खतनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धन साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत मिशन टप्पा दोनअंतर्गत अभियान

राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) टप्पा-२ अंतर्गत गावागावांमध्ये स्वच्छतेच्या ज्या सोयी निर्माण करण्यात आलेल्या आहेत, त्याचा ग्रामस्थांनी नियमित वापर करून आपले गाव कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावे, हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी 'कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू' हे अभियान सुरू होत आहे.

१ मेपासून सुरुवात; गावोगावी दवंडी, सूचना फलक

मोहिमेअंतर्गत विभागामार्फत माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांनाही गती देण्यात आली आहे. जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर डिजिटल पोस्टर्स प्रसिद्धी, ग्रामपंचायतींमध्ये सूचना फलकांवर मोहिमेची माहिती देणे, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर विविध बैठका आयोजित करणे तसेच गृहभेटी घेऊन कचऱ्याच्या स्रोतावर वर्गीकरण व सेंद्रिय खताचे महत्त्व याबद्दल जनजागृती केली जात आहे. या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेविषयीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रत्येक गाव स्वच्छ अन् सुंदर बनवायचंय!

सध्या जिल्ह्यात २६३५ सामुदायिक आणि १२५४ घरगुती नाडेप खड्डे उपलब्ध असून, त्यांच्या प्रभावी वापरातून दरवर्षी हजारो टन जैविक कचऱ्याचे रूपांतर सेंद्रिय खतात करता येईल. यामुळे स्वच्छतेबरोबरच शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे सेंद्रिय खत उपलब्ध होईल.

खड्ड्यांत खत बनण्यासाठी किती दिवस लागणार?

ही मोहीम तीन टप्प्यांत राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात (१ ते १० मे) नाडेप खड्डे जैविक कचरा व शेणाच्या थरांसोबत भरले जातील. दुसऱ्या टप्प्यात (११ मे ते ३१ ऑगस्ट) खड्यांची देखभाल केली जाईल. तिसऱ्या टप्प्यात (१ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर) तयार खताचे परीक्षण व स्थानिक शेतकऱ्यांना वितरण होईल.

तालुक्यातील या गावांमध्ये मोहिमेला सुरुवात

भिवापूर-मरुपार, हिंगणा-सुकळी गुपचूप, कामठी-भामेवाडा, कळमेश्वर-सिंदी (झुनकी), काटोल-खुर्सापर, कुही-माळणी, मौदा-बोरगाव, नागपूर-डोंगरगाव, नरखेड-सिंदी उमरी, पारशिवनी-नयाकुंड, सावनेर-मानेगाव (पंधराखेडी), रामटेक-भिलेवाडा व उमरेड-चांपा.

अभियानाच्या पडताळणीची जबाबदारी कोणावर?

या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना तालुकावार जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय, प्रत्येक पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांना मोहिमेसाठी विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, स्वच्छ भारत मिशन विभाग, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या समन्वयाने ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार आहे.

ही मोहीम केवळ कचरा व्यवस्थापनापुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागात पर्यावरणपूरक शेतीला चालना देणारी आणि जनजागृती घडवणारी एक व्यापक चळवळ ठरेल. गावागावांत ही प्रक्रिया यशस्वी झाली तर नागपूर जिल्हा 'स्वच्छ, हरित आणि सेंद्रिय' बनवता येईल. - कुणाल उंदिरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद, नागपूर

हे ही वाचा सविस्तर :Maharashtra Weather Update: गारपिटीची शक्यता कमी मात्र अवकाळी पाऊस 'या' तारखेपर्यंत, वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीखतेग्रामीण विकास