सततच्या ढगाळ वातावरणाने (cloudy weather) किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे फुलकोबीचे (cauliflower) प्रचंड नुकसान झाले आहे. बाजारात आवक वाढल्याने फुलकोबीचे दरही कोसळले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
अलिकडच्या काळात पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव (Insect Infestation) यामुळे शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यातच बाजारात भावही समाधानकारक मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
काही शेतकरी खरीप, रब्बी पिकांबरोबर भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहेत. परंतु, भाजीपाल्याची शेतीही आता बेभरोशाची झाली आहे.
गेल्या महिन्याभरापासून सतत ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने भाजीपाला पिकावर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. परंतु, ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने कीड नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे.
यंदा प्रामुख्याने फुलकोबीचे पीक धोक्यात आले आहे. त्यातच जे काही कोबीचे उत्पादन होईल, ते बाजारात विक्रीसाठी आणले तर पडत्या भावात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे काढणीचा खर्चही वसूल होत नसल्याचे उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोबीसह इतर भाजीपाल्याचीही वेगळी परिस्थिती नाही.
सर्वच भाज्यांचे भाव घसरल्याने उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक खर्च निघणेही अवघड आले आहे. किमान दोन ते तीन आठवडे तरी भाजीपाल्याचे दर पडते राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
फूलकोबीने स्वप्न कोमेजले!
फूलकोबीला समाधानकारक भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, किडीचा हल्ला, पडत्या भावामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न कोमेजले आहे.
आवक अचानक वाढली
ढगाळ वातावरणाचा फटका भाजीपाल्याला बसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी जो काही भाजीपाला आहे तो विक्री करीत आहेत. परिणामी, भाजीमंडईत आवक वाढली आहे. त्यामुळे भावात घसरण झाल्याचे व्यापारी, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
५० वरून ५ रुपये भाव
पावसाळ्यात एक किलो फुलकोबीसाठी ५० ते ६० रूपये मोजावे लागत होते. आता मात्र ५ रूपयांमध्ये एक किलो कोबी विक्री होत आहे.
फूलकोबीला कशाचा फटका?
सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फुलकोबीसह इतर भाजीपाला पिकालाही फटका बसला आहे.
फुलकोबीपेक्षा ब्रोकोलीला जास्त भाव
फुलकोबीच्या तुलनेत ब्रोकोलीचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे भाव फुलकोबीपेक्षा जास्त आहे.
ब्रोकोली व फूलकोबीत फरक काय?
ब्रोकोली आणि फुलकोबी क्रूसिफेरस भाज्यांच्या एकाच कुटुंबातील आहेत. परंतु, दिसण्यात आणि चवीत भिन्न आहेत.
लॉट संपल्यावर कोबीला पुन्हा येणार भाव
सध्या मंडईत येत असलेला लॉट संपल्यावर कोबीला पुन्हा भाव येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या मात्र पडता भाव मिळत आहे. यंदा भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने लागवडखर्चही वसूल झालेला नाही. प्रामुख्याने फुलकोबी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. - शिवाजी फटांगळे, भाजीपाला उत्पादक
सोयाबीनसह इतर शेतमालाचे भाव पडलेले असताना आता भाजीपाल्याचे दरही गडगडले आहेत. याचा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, लागवडखर्चही वसूल होत नाही. त्यामुळे भाववाढीची प्रतीक्षा आहे. - पिराजी घुगे, भाजीपाला उत्पादक
एक एकर क्षेत्रात पत्ता व फुलकोबीची लागवड केली आहे. सध्या या दोन्ही पिकांची स्थिती उत्तम आहे. या पिकासाठी आतापर्यंत जवळपास ६० हजार रुपये खर्च आला आहे. पत्ताकोबी काढणीसाठी आली आहे. सध्या आठवडी बाजारात दहा रुपयाला कोबीचे दोन फूल घेण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे लावलेला खर्चही निघतो की नाही, याची चिंता लागली आहे. अनेक जण मंचुरियन बनवण्यासाठी पत्ताकोबीचा वापर करीत असल्याने या कोबीला फुलकोबीपेक्षा थोडा चांगला भाव आहे. - मारुती तांबेकर, फुलकोबी उत्पादक शेतकरी, टेंभुर्णी
सध्या आठवडी बाजारात फूल कोबीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. महिनाभरापूर्वी ही फुलकोबी ५० रुपये किलो विक्री केली जात होती; मात्र आता आठवड्याभरापासून फुलकोबीसह इतर भाजीपाल्याचेही भाव कमी झाले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस हे भाव असेच राहणार असल्याची शक्यता आहे. - मनोहर तांबेकर, फुलकोबीचे ठोक विक्रेते.
हे ही वाचा सविस्तर : Bibtya dahshat : महाराष्ट्रात 'इतक्या' हजार बिबट्यांचा मुक्तसंचार वाचा सविस्तर