Join us

Cess Scheme : उपकर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार कृषी साहित्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:49 IST

Cess Scheme : जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेंतर्गत (Cess Scheme) कृषी विभाग शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना राबवित आहेत. यात फवारणी चार्जिंग पंप, सोयाबीन चाळणी तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठीअनुदान दिले जाते.

Cess Scheme : जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेंतर्गत (सेस फंड) बॅटरी संचालित फवारणी पंपासाठी १,१४० तर सोयाबीन चाळणीसाठी ८० शेतकऱ्यांची निवड झाली आहे. साहित्य खरेदीनंतर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या उपकरातून (Cess Scheme) वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. कृषी विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी नोव्हेंबर महिन्यात ७५ टक्के अनुदानावर फवारणी चार्जिंग पंप (बॅटरी संचालित) व सोयाबीन चाळणीसाठी अर्ज मागविले होते.

छाननीअंती उपकर योजनेंतर्गत लाभार्थीची निवड झाली असून, फवारणी पंपासाठी ११४० तर सोयाबीन चाळणीसाठी ८० शेतकरी पात्र ठरले आहेत.

डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे साहित्य खरेदीनंतर लाभार्थ्यांच्या बैंक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. १० मार्चपर्यंत अनुदान मागणी प्रस्ताव कृषी अधिकारी/कृषी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. (Cess Scheme)

९३७५ रुपये सोयाबीन चाळणीसाठी

सोयाबीन चाळणी खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना ९ हजार ३७५ रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. सोयाबीन चाळणी खरेदी करण्यासाठी कृषी विभागाने पुर्वसंमती दिलेली आहे.

आकडे बोलतात?

फवारणी पंप११४०
सोयाबीन चाळणी८०

तालुकानिहाय सोयाबीन चाळणी लाभार्थी

तालुकासंख्या
मालेगाव२१
मं. पीर३२
रिसोड२२
मानोरा

वाशिम, कारंजा तालुका निरंक!

सोयाबीन चाळणी यंत्रातून वाशिम व कारंजा तालुक्यातील एकाही लाभार्थीचा समावेश नाही. सर्वाधिक ३२ लाभार्थी मंगरूळपीर तालुक्यातील आहेत. १० मार्चपर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयात अनुदान मागणी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. या मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास पूर्वसंमती रह समजण्यात येणार आहे.

२८०० रुपयांचे अनुदान फवारणी पंपासाठी!

फवारणी पंप खरेदी केल्यानंतर कृषी विभागाकडे जीएसटीचे बील सादर करावे लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २८०० रुपयांचे अनुदान जमा केले जाणार आहे.

अनुदानासाठी कोणती कागदपत्रे अनिवार्य ?

* साहित्य खरेदी केल्याची जीएसटी क्रमांकाची खरेदी पावती

* बँक खात्याच्या प्रथम पानाची छायांकित प्रत

* अनुदान मागणी पत्र व प्रतिज्ञापत्र

* विस्तार अधिकाऱ्यांचा तपासणी अहवाल

* खरेदी केलेल्या बाबीसह तपासणी अधिकाऱ्यांसोबतचा जिओ टॅगिंग फोटो

हे ही वाचा सविस्तर : Tamarind Tree : चिंचेच्या झाड सावलीसह देते हजारो रुपयांचे उत्पादन

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीवाशिम