Join us

कोकणातील अर्थकारण ठरविणारं पिक 'काजू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 16:18 IST

कोकणात मुख्य करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सिंधुदुर्गातील 'वेंगुर्ला' ही काजू प्रजाती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी काजू पीक शेतकऱ्यांच्या हाती येते.

कोकणात मुख्य करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सिंधुदुर्गातील 'वेंगुर्ला' ही काजू प्रजाती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी काजू पीक शेतकऱ्यांच्या हाती येते.

यात ओल्या काजूगराला अधिक मागणी असते आणि त्याला दरही चांगला मिळतो, मात्र. हे प्रमाण अत्यल्प आहे. काजूगर सुकल्यानंतर त्यांना अत्यल्प दर मिळतो. परंतु याच काजू बोंडावर प्रक्रिया केली तर त्याचा दर ७ पटीने वाढतो हे येथील अर्थकारण आहे.

यावर्षी मात्र तापमान वाढीचा फटका काजू पिकाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. काजूचे उत्पन्न अगदी ३० ते ४० टक्केच आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. कमी प्रमाणात उत्पादन येवूनदेखील काजू बियांना बाजारात दर नाही. १२० ते १३० रूपये किलोने काजू बी खरेदी करण्यात येत आहे.

खरं तर शासनाने इतर पिकांप्रमाणे काजूलाही हमीभाव द्यावा, अशी मागणी यानिमित्ताने बागायतदार आणि शेतकऱ्यांमधून केली जात आहे. राज्याच्या इतर भागात हंगामी पिकांना शासनाकडून हमीभाव मिळतो. मग कोकणातील काजूला का नाही ? कोकणवर अन्याय कशासाठी? अशी भावना यातून निर्माण झाली आहे आणि ती योग्यच असून शासनकर्त्यांनी काजूला हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक बनले आहे.

काजू बोंडावर उगवेल त्याच भागात प्रक्रिया करता आली, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे शक्य आहे आणि याचसाठी या भागात काजू बोंड प्रक्रिया झाल्यास होणारा आर्थिक लाभ देण्यासाठी हा काजू प्रक्रिया उद्योग महत्वाचा ठरतो.

काजू बोंडावर आणखी काही प्रक्रिया करणे आणि नव्या प्रजाती विकसीत करणे, यातून शेतकरी संपन्न होईल आणि त्या अर्थानेच काजू बोंड प्रक्रिया केंद्र संजीवनी ठरणार आहेत. काजू उत्पन्नाच्या नव्या पद्धती आणि प्रजातींचा लाभ मिलेल यासमवेत याला सेंद्रिय शेतीची जोड दिल्यास हे उत्पादन सर्वच बाजारपेठांमध्ये मागणीत वाढ होऊन अधिक लाभ शेतकऱ्यांना मिळेल.

फळशेती ही कोकणची वेगळी ओळख आहे. नारळ आणि सुपारी यांच्या जोडीला हापूस आणि आता न काजू यातून कोकणच्या कृषी न क्षेत्राचा विकास आणि आर्थिक उन्नती दिसून येते. कोकणात काजू उद्योगातून सुमारे तीन ते चार हजार कोटींहून अधिक उलाढाल होते.

केरळमध्ये काजू उद्योग घराघरात आहे शंभर किलो प्रकिया करणाऱ्या काजू उद्योगातून सहा महिलांना रोजगार मिळतो. कोकणात काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. परंतु येथील उत्पादित होणारे काजू बी प्रक्रियेसाठी परराज्यात पाठविले जाते.

गावागावात बी संकलित केले जाते. पण व्यावसायिक ते विकत घेऊन परराज्यातील कंपन्यांना देतात. स्थानिक प्रक्रियादारांची काजू बी विकत घेण्याची आर्थिक क्षमता नसते. त्यामुळे एकुण काजू बी उत्पादनापैकी अवघ्या तीस टक्के बीवर कोकणातील कारखान्यात प्रक्रिया केली जाते.

बँकांच्या उदासीन धोरणामुळे कर्ज उपलब्ध होत नाही. यासाठी राज्य शासनाने धोरण ठरविले पाहिजे तरच येथील उद्योजक वाढतील. सध्या महाराष्ट्रात विविध प्रकारचे मोठे उद्योग आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

तसेच प्रयत्न काजू बीवरील प्रक्रिया उद्योगांसारख्या शाश्वत रोजगार देणाऱ्या कारखान्यांसाठी केले तर काजू उद्योगाला चांगले दिवस येतील. त्यासाठी काजू कारखाने जगता ने धोरण अवलंबावे लागणार आहे. गेल्या काही वर्षात ओले काजू गर विक्री व्यवसायातून लाखो रूपयांची उलाढाल होते.

हॉटेल उद्योगात याचे महत्व लक्षात घेऊन ओले काजू बी वर्षभर वापरण्यास मिळावी, यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. हा काजू सहा महिन्यांपासून अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी अभ्यास झाला तर शेतकऱ्याला अधिक नफा मिळवता येईल.

- कोकणातील काजूची गुणवत्ता चांगली असल्यामुळे त्याला जगभरातून मागणी आहे. त्यादृष्टीने शासनाने नियोजन करायला हवे.- गावागावातून गोळा करण्यात येणारे काजू बी पूर्णतः सुकलेली नसते. त्यामुळे दर्जा घसरतो आणि किलोचा दरही शेतकऱ्यांना पाच ते दहा रूपयांनी कमी मिळतो. त्यासाठी फेरीवाल्यांना काजू बी देताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.

महेश सरनाईकउपमुख्य संपादक लोकमत

अधिक वाचा: Bamboo Farming बांबू हा जणू कल्पवृक्षच; दगडी कोळशाला बांबू हाच पर्याय

टॅग्स :शेतकरीपीकशेतीकोकणसरकारराज्य सरकार