Join us
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी होतेय नामशेष; कारागीर झाले बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 12:26 IST

शेतकरी पूर्वी बैलगाडी, दमणीचा हौसेने वापर करीत असत. वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने दळणवळणासाठी बैलगाडी वापरात येत होती. आता मोटारसायकलसह इतर मोठ्या वाहनांचा वापर वाढल्याने बैलगाडी दिसत नाही. विना खर्चीक साधन असूनदेखील शेतकऱ्यांना बैलगाडी नकोशी वाटू लागली असल्याचे दिसून येत आहे.

गणेश पंडित

काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडे विविध कामांसाठी बैलगाडीचा वापर होत असे. परंतु, आता आधुनिकतेच्या युगात बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेतशिवारातील खुट्यावरील बैलांची संख्याही नगण्य झाली आहे. काळाच्या ओघात बऱ्याच शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरसारखी साधने उपलब्ध झाल्याने बैलगाडीचा वापर बंद झाला आहे. यामुळे बैलगाडीनिर्मिती करणारे कारागीर बेरोजगार झाले आहेत. यामुळे बैलगाडीची निर्मितीदेखील बंद होण्याच्या मार्गावर आली आहे.

सध्या शेतीकामे करण्यासाठी बैलांची संख्या रोडावली आहे. पूर्वी शेतकरी बैलगाडी, दमणीचा हौसेने वापर करीत असत. वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने दळणवळणासाठी बैलगाडी वापरात येत होती. आता मोटारसायकलसह इतर मोठ्या वाहनांचा वापर वाढल्याने बैलगाडी दिसत नाही. विना खर्चीक साधन असूनदेखील शेतकऱ्यांना बैलगाडी नकोशी वाटू लागली असल्याचे दिसून येत आहे.

बैलांची संख्याही झाली कमी

• काही वर्षापूर्वी एका शेतकऱ्याकडे ४ ते ५ बैलजोडी असायची. कालांतराने बैलजोडीची संख्याही कमी झालेली आहे.

शेतकर्‍यांच्या दावणीला गावरान गाई दुर्मिळ; संकरीत गाई अन म्हशींची संख्या वाढली

• मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलजोडी दिसून दिसून येते. जालना जिल्ह्यातील केदारखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात १० वर्षांपूर्वी १२ गावांत दोन हजार बैलांची नोंद आहे.

दोन वर्षांत एकही गाडी विकली नाही

केदारखेडा येथे लोखंडी बैलगाडी तयार करणारे सहा ते सात कारागीर आहेत. परंतु, त्यांच्याकडे मागील दोन वर्षापासून एकही बैलगाडीची मागणी राहिलेली नाही. पूर्वी एका दिवसात पाच ते सहा बैलगाड्या तयार करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून नोंदवण्यात येत होती. मात्र, बैलगाडीचा वापर कमी झाल्याने कारगिरांनी दोन वर्षांपासून एकही बैलगाडी विक्री झालेली नाही. यामुळे बैलगाडी तयार करणारे कारागीर बेरोजगार झाले आहेत.

अगोदरच्या काळात बैलगाड्या मोठ्या प्रमाणात विक्री करायचो, त्याला ग्राहक देखील मिळत होते. परंतु, शेतकयांनी ट्रॅक्टरचा वापर करणे सुरू केल्याने ग्राहक येणे बंद झाले आहे. दोन वर्षांपासून आमची एकही बैलगाडी विक्री झालेली नाही. याउलट ट्रॅक्टरवर चालणाऱ्या साधनांची विक्री वाढलेली आहे. - करण केवट (बिलगे), अवजारे विक्रेते, केदारखेडा

लोखंडी गाडी बनविली तर ती २५ ते ३० वर्षे टिकते. परंतु,शेतकऱ्यांनी बैलगाडीचा वापर कमी केलेला आहे. त्यामुळे बैलगाडीची मागणीच नाही. दोन वर्षांत एकही बैलगाडी तयार केलेली नाही. - गंगाधर केवट (बिलगे), लोखंडी अवजार विक्रेता, केदारखेडा.

टॅग्स :शेतीशेतकरीमहाराष्ट्रसांस्कृतिकबेरोजगारी