Join us

Bogus Khat : बोगस खतामुळे शेतकरी मातीत, बनवणारे रॅकेट तेजीत; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:29 IST

Fake Fertilizer खतांचे वाढलेले दर, मजुरांची वानवा यामुळे शेती आतबट्ट्यात येत असताना बोगस खताच्या मात्राने शेतकरी अधिक मातीत जात आहे.

कोल्हापूर : खतांचे वाढलेले दर, मजुरांची वानवा यामुळे शेती आतबट्ट्यात येत असताना बोगस खताच्या मात्राने शेतकरी अधिक मातीत जात आहे. बोगस खत बनवणारे रॅकेट कोल्हापूरसह शेजारील जिल्ह्यात सक्रिय असून, काही विक्रेते त्यांच्या संपर्कात असतात.

हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे. अगोदरच विविध कारणाने शेती आर्थिक अरिष्टात सापडली आहे. खतांच्या वाढलेल्या किमतीने शेतीचे अर्थकारण बिघडले आहे.

त्यात बोगस खते माथी मारून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून बोगस खतांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

खुपिरे (ता. करवीर) येथील रंकभैरव कृषी केंद्रामध्ये बोगस खताची विक्री उघडकीस आल्यानंतर कृषी विभागासह शेतकरीही चक्रावून गेले आहेत.

या बोगस खतामध्ये खते नव्हे तर मातीच शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा अहवाल आला आहे. कोल्हापूरसह शेजारी जिल्ह्यात अशा प्रकारच्या बोगस खतांचे अड्डे असल्याचे समजते.

या रॅकेटच्या संपर्कात काही विक्रेते असून, त्यांनीही यापूर्वी बोगस खतांची विक्री केल्याचा अंदाज असून हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे.

बॅग एका कंपनीची, खते दुसरीचबाजारात वेगवेगळ्या खतांच्या कंपन्या आहेत. त्यामुळे हुबेहूब नावाजलेल्या कंपन्यांच्या बॅगांमधून बोगस खते विकण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे.

खुपिरे येथील दुकानातून खते नव्हे, मातीची विक्रीखुपिरे येथील रंगभैरव दुकानातून विक्री केलेल्या बोगस खताचा अहवाल आला असून, यामध्ये १०:२६:२६ यामध्ये १० टक्के नायट्रोजन (युरिया), फॉस्फेट व पोटॅश प्रत्येकी २६ टक्के असावा लागतो. कृषी विभागाच्या तपासणीत यापेक्षा अर्धा टक्का जरी प्रमाण वर-खाली झाले तर ते खत अप्रमाणित समजले जाते. मात्र, या दुकानात सापडलेल्या बोगस खतात नायट्रोजन २.१९ टक्के, फॉस्फेट ०.४२ टक्के, तर पोटॅश ०.८२ टक्के एवढेच प्रमाण आहे. खताच्या बॅगमध्ये माती भरून शेतकऱ्यांना मातीत घालण्याचा उद्योग केल्याचे उघड झाले आहे.

दहा बॅगेत एक बोगस बॅगची विक्री?मोठ्या प्रमाणात खताची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या माथी दहा बॅगमध्ये एक बोगस बॅग दिली जाते. एकसारखी पोती दिसत असल्याने शेतकऱ्यांनाही संशय येत नाही.

अधिक वाचा: लोकवर्गणीतून काटा उभारूया अन् कारखान्यांच्या काटामारीतील लुटीला पायबंद घालूया

टॅग्स :खतेशेतकरीपीककोल्हापूरशेतीसेंद्रिय खत