Join us

उन्हाळी बाजारीची प्राणी पक्ष्यांकडून नासाडी; शेतकऱ्यांनी लढवली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 4:30 PM

ऐन फुलोऱ्यात व दाणे भरतेवेळी पक्ष्यांकडून पिकाची मोठी नासाडी केली जाते. ज्यात वन्यप्राणी रानडुक्कर, हरणांकडून मोठे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांनी यावर एक उपाय शोधला आहे तो कोणता ते वाचा सविस्तर.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्तपोखरीसह परिसरातील धनगर पिंपरी, लालवाडी, शेवगा, नागझरी, कर्जत आदी गावांत ज्या शेतकर्‍यांकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे. यंदा त्या शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी पिकाला पसंती दिली असून, पीकही चांगलेच बहरले आहे. मात्र ऐन फुलोऱ्यात व दाणे भरतेवेळी पक्ष्यांकडून पिकाची मोठी नासाडी केली जात आहे. त्यात वन्यप्राणी रानडुक्कर, हरणांकडून मोठे नुकसान होत आहे.

यंदा पाण्याचा अत्यल्प साठा असल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजरी पिकाला पसंती दिली. अगदी तीन महिन्यांत पदरात पडणारी पिके कसेबसे पाणी देऊन जगविले.

काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना ऐन फुलोरा व दाणे भरताना पाणी कमी पड्डू लागले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी बाजरी क्षेत्राचा अर्धा भाग कसाबसा जगविला. यात महत्त्वाचा भाग म्हणजे जनावरांसाठी बाजरीचा चारा व भूस कामी येते. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न काही अंशी सुटेल, अशी अपेक्षा आहे.

शेतकर्‍यांची ही युक्ती ठरते आहे फायद्याची ..  

वन्यप्राणी व पक्ष्यांकडून होणार्‍या नासाडीवर अनेक शेतकऱ्यांनी नवीनच शक्कल लढविली आहे. यात शेतकरी रात्री - अपरात्री फटाके फोडून वन्य प्राण्यांना हाकलून लावत आहे, तसेच ही युक्ती फायद्याची ठरत असल्याचे शेतकरी सांगतात. त्याचबरोबर वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

हिरवा चारा मिळत नसल्याने मुरघासाचा पर्याय; जनावरे ही आवडीने खातात 

वन्य प्राण्यांच्या धास्तीने शेतकरी देतात पहारा

• वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकाची नासाडी होत असल्याचे शेतकरी सांगतात. हस्तपोखरीतील शेतकरी प्रभाकर दौंड यांनी दोन एकरांत बाजरी पीक घेतले असून, वन्य प्राण्यांच्या धास्तीने ते शेतावरच पहारा देत आहेत.

टॅग्स :पीकसमर स्पेशलशेतीपीक व्यवस्थापनशेतकरीमराठवाडा