दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामामध्ये ८ लाख ८३ हजार ६९ मे. टन ऊस गाळप करून ९ लाख २७ हजार १९७ साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता करण्यात आली. हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी आभार व्यक्त केले.
चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनाने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातून नोंद असलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करून ८ लाख ८३ हजार ६९ मे. टन ऊस गाळप करून ९ लाख २७ हजार १९७साखर पोत्यांचे उत्पादन केले असून, गाळप हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार व मजूर यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामात १५ फेब्रुवारीअखेर गाळप केलेल्या उसासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे ३,२७३ रुपये प्रति मे. टनाप्रमाणे २८० कोटी रुपये अदा केले आहेत.
भीमाशंकर कारखान्यामार्फत "दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०" ही महत्त्वाकांक्षी योजना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत असून, योजनेंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, माती व पाणी परीक्षण सुविधा, उधारीवर ताग व ऊस बेणे वाटप, ऊस रोपवाटिका, खासगी ऊस लागवड व ठिबक सिंचन अर्थसाहाय्य, उधारीवर द्रवरूप जीवाणू खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैव संजीवक, ह्युमिक ॲसिड, जैविक कीड नियंत्रण, ईपीएन, रासायनिक खते व औषधे, पाचट कुट्टी आदी पुरवठा केला जातो.
तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी योजनेतील सुविधांचा लाभ घेऊन ऊस लागवडीवर व उत्पादन वाढीवर भर द्यावा, असे आवाहन केले. सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आधुनिक सोयीसुविधा व सतत वेळेवर दिलेल्या दरामुळे कारखान्याने मिळविलेल्या विश्वासाच्या जोरावर यशस्वी वाटचाल सुरू आहे, असे कारखान्याचे चेअरमन बेंडे यांनी सांगितले.
Web Summary : Bhimashankar Sugar Factory successfully concluded its crushing season, producing 9.27 lakh sacks of sugar from 8.83 lakh metric tons of sugarcane. The factory has paid farmers ₹3,273 per ton, totaling ₹280 crore. They also run a scheme for productivity enhancement.
Web Summary : भीमाशंकर चीनी मिल ने 8.83 लाख मीट्रिक टन गन्ने से 9.27 लाख बोरी चीनी का उत्पादन कर सफलतापूर्वक पेराई सत्र समाप्त किया। मिल ने किसानों को ₹3,273 प्रति टन के हिसाब से कुल ₹280 करोड़ का भुगतान किया है। वे उत्पादकता बढ़ाने के लिए एक योजना भी चलाते हैं।