पुणे जिल्ह्यातील जुन्रर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. मागील एक ते दीड महिन्यात बिबट्या पकडल्याची मोहीम सुरू असून जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये ९० च्या जवळपास बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. पण मागील काही दिवसांमध्ये भिमाशंकरच्या जंगलात बिबटे सोडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाने मात्र कोणतेही बिबटे सोडले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे एकापाठोपाठ झालेल्या तीन हल्ल्यानंतर वनविभागाने हल्लेखोर बिबटे पकडण्याची मोहीम राबवली होती. त्याप्रमाणे बिबट्याचा अधिवास असलेल्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. हल्ले वाढल्यानंतर या भागातील बिबट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
त्यानंतर येथील बिबटे वनतारा येथे हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. पण बऱ्याचदा मानवी वस्तीतील बिबटे पकडल्यानंतर जंगलात नेऊन सोडून दिले जातात आणि त्यानंतर तेच बिबटे मानवी वस्तीत येतात.
पण ऑक्टोबरपासून बिबट्यांचा प्रश्चन चव्हाट्यावर आला असताना शिरूर आणि जुन्नर परिसरात पकडलेले बिबटे भिमाशंकर परिसरातील कोंडवळ भागातील जंगलात सोडून दिले असल्याचा आरोप तळेघर जवळ असलेल्या निगडाळे येथील स्थानिकांनी केला आहे.
बिबटे सोडल्याच्या आरोपावर मात्र वनविभागाने स्पष्टीकरण दिले असून बिबटे जंगलात सोडले नसल्याचं सांगितलं आहे. मागील दीड ते दोन महिन्यापासून शिरूर, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यात बिबटे पकडण्याची मोहीम सुरू असून आत्तापर्यंत जवळपास ९० पेक्षा जास्त बिबटे पकडले आहेत.
तर हे बिबटे माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवले असून यातील कोणताही बिबट्या जंगलात सोडला नाही. यातील काही बिबटे गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्यात येणार आहेत. असे स्पष्टीकरण वनविभागाने दिले आहे.
हेही वाचा : हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे आणि आरोग्यदायक परिणाम वाचून तुम्हीही होणार थक्क
