Join us

Bhavantar Yojana : वर्ष २०२३ मध्ये दर पडल्याने नुकसान; भावांतर योजनेचा मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:09 IST

Bhavantar Yojana : वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींत शेतमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी भावांतर योजनेद्वारे (Bhavantar Yojana) शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. वाचा सविस्तर

अमरावती : वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींत शेतमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी भावांतर योजनेद्वारे (Bhavantar Yojana) शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.

यामध्ये सामायिक शेतकरी, तसेच ई-पीक पाहणी नसलेले शेतकरी वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा संधी दिली आहे. यामध्ये २८ फेब्रुवारीच्या आत प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना शासन अनुदान मिळू शकणार आहे.

वर्ष २०२३ च्या हंगामातील कापूससोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शासनाद्वारा दिले जाते. यासाठी यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची खातरजमा संबंधित शेतकऱ्यांनी पोर्टलवर किंवा कृषी सहायकांजवळ करावी लागणार आहे. (Bhavantar Yojana)

ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही. मात्र, सात-बाऱ्यावर कापूससोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना संबंधित तलाठी यांच्याकडे संपर्क करावा लागेल व वनपट्टेधारक खातेदार यांना तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करावा लागेल.

अशा शेतकऱ्यांच्या याद्या महसूल विभागाद्वारे याद्या २५ फेब्रुवारीपर्यंत कृषी विभागास देण्याचे निर्देश कृषी संचालकांनी दिले आहेत. मात्र अशा प्रकारच्या याद्या अद्याप प्राप्त झालेल्या नसल्याची माहिती या विभागाने दिली दरम्यान मुदतवाढ संपत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून मुदतवाढीच मागणी करण्यात आलेली आहे.

....तर मिळेल वंचित शेतकऱ्यांना लाभ

अर्थसाहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र खातेदारांना आपले आधार संमती व सामायिक खातेदारांना आधार संमतीसह ना-हरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारीपर्यंत कृषी सहायकांकडे द्यावे लागणार आहे. याबाबतचा नमुना कृषी सहायकांकडे उपलब्ध आहे. विहित मुदतीत कागदपत्रे जमा न झाल्यास शेतकरी शासन अर्थसाहाय्यापासून वंचित राहणार आहे.

५ हजार रुपये हेक्टरी, दोन हेक्टर मर्यादेत मिळणार मदत

* तलाठ्यांचे सहकार्य नाही, शेतकऱ्यांचा आरोप योजनेसाठी यादीत नाव शोधण्यासह आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन २८ फेब्रुवारी आहे. मात्र, महसूल विभागाचे कर्मचारी सहकार्य करीत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

* त्यामुळे मुदतीत कागदपत्रे सादर न झाल्यास शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. याबाबत भातकुली तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना गुरुवारी निवेदन दिले.

* कापूस व सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरी मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शासनाद्वारा मिळणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market: सोयाबीन ढेपची मागणी कमी होण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनकापूसशेतकरीशेतीकृषी योजनासरकारी योजना