Join us

Bamboo Farming: बांबू लागवडीतून होणार पर्यावरण संवर्धन; आर्थिक फायदा कसा ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:12 IST

Bamboo Farming: बदलत्या वातावरणात कार्बन उत्सर्जन कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी बांबू लागवडीला (Bamboo Cultivation ) चांगला पर्याय मानला जात आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा आर्थिक लाभ मिळेल ते वाचा सविस्तर.

नारायण सावतकार

बदलत्या वातावरणात कार्बन उत्सर्जन कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी बांबू लागवडीला (Bamboo Cultivation ) चांगला पर्याय मानला जात आहे. शासकीय पातळीवर यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून, संग्रामपूर तालुक्यात १२० हेक्टर क्षेत्रावर ८२ हजार बांबूची लागवड करण्यात आली आहे.

यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार असून, जमिनीची धूपही थांबणार आहे. सध्याच्या काळात अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टी यांसारख्या समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

या सर्व समस्यांचे मुख्य कारण पर्यावरणातील बदल आहे. या समस्येवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव उपाय आहे. सरकार या दृष्टीने बांबू लागवडीचा उपक्रम राबवत आहे.

असे मिळते अनुदान

मग्रारोहयो योजनेंतर्गत बांबू मिशन अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमात पंचायत समितींतर्गत २३२ हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले गेले होते. त्यामध्ये १२० हेक्टरवरील सलग व बांधावर ८२ हजार बांबू रोपांची लागवड पूर्ण झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांना अनुदानदेखील दिले जात आहे. शेतकऱ्यांना २०० झाडांसाठी ८७ हजार रुपये आणि हेक्टरप्रमाणे ७०० झाडांसाठी ५ लाख रुपयांचे अनुदान मिळत आहे.

तालुक्यातील जमिनीची धूप थांबणार!

बांबू झाडातून निर्माण होतो प्राणवायू बांबूमध्ये पर्यावरण समतोल राखण्याची प्रचंड क्षमता आहे. एका बांबूमधून ३२० किलो प्राणवायू निर्माण होतो आणि तो मोठ्या प्रमाणावर कार्बन शोषून घेतो. इतर वृक्षांच्या तुलनेत बांबू ३० टक्के जास्त कार्बन शोषून घेतो. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.

...तर लागवडीमध्ये तालुका ठरू शकतो प्रथम !

संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांबूच्या लागवडीचा लाभ घेतल्यास, ते केवळ आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरत नाहीत, तर जमिनीची धूप थांबविण्यासाठी आणि संरक्षण जाळी म्हणूनही त्याचा उपयोग होतो. संग्रामपूर तालुका बांबू लागवडीमध्ये प्रथम ठरू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर व शेतात बांबूची लागवड केल्यास आर्थिक फायद्याबरोबर जमिनीची धूप थांबविता येते. तसेच संरक्षण जाळी म्हणून उपयोग करता येते. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा लाभ घ्यावा. - माधवराव पायघन, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, संग्रामपूर

विविध उत्पादनेही होतात तयार

* बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही होतो. बांबूपासून विविध उत्पादने तयार केली जातात. तसेच, पडीक जमिनीतून शेतकऱ्यांना एक अतिरिक्त उत्पन्न मिळते. यासाठी संग्रामपूर तालुक्यात बांबू लागवडीचे अभियान राबविण्यात येत आहे.

* १२० संग्रामपूर तालुक्यात १२० हेक्टरवर ८२ हजार बांबू रोपांची लागवड करण्यात आली आहे. याकरिता अनुदान दिले जाते.

हे ही वाचा सविस्तर : Agriculture News: दोन वर्षात १६६ कोटींचे अनुदान थकले; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रबांबू गार्डनकृषी योजनाशेतकरीशेती