Join us
Daily Top 2Weekly Top 5

Baipola : सर्जा राजाचा उत्सव! राज्यभरात भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 22:50 IST

महाराष्ट्राच्या विविध भागांत विविध प्रकारे बैलपोळा साजरा करतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील काही भागांत आणि कोल्हापुरात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो.

पुणे : आज राज्यभरातील विविध भागांत भाद्रपद बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अंगावर झुली, गुलाल, शिंगाला रंग, गोंडे, कपाळावर गंध, पायात गोंडे घालून बैलांच्या ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक शौकिनांनी तर डिजे लावून बैलांच्या मिरवणुका काढल्याने या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. बैलपोळा हा अनेक ठिकाणी श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. तर काही ठिकाणी भाद्रपद अमावास्येला साजरा करण्यात येतो. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात भाद्रपद अमावस्येला पोळा साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध भागांत विविध प्रकारे बैलपोळा साजरा करतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील काही भागांत आणि कोल्हापुरात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो.

वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा हा एकमेव दिवस असतो. या दिवशी बैलांना बैलगाडीला जुंपत नाहीत. त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन अंघोळ घातली जाते. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. व त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. 

बैलपोळ्याच्या दिवशी बैलांच्या शिंगांना सजवले जाते. त्यांच्या अंगावर विविध रंग लावले जातात. अंगावर झूल चढवणे, पायात, शिंगात गोंडे बांधणे, शिंगाला रंग लावून गावातील सर्व बैलांची मिरवणूक काढली जाते. वाजत गाजत ही मिरवणूक गावातील मंदिरात जाते आणि मंदिरात दर्शन घेऊन पु्न्हा बैलांना घरी नेऊन ओवाळले जाते.  

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहाराष्ट्र