Join us
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांचा संपर्क टाळा, त्वचारोगाचा वाढतोय धोका; नागरिकांनो काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:02 IST

शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. विशेष म्हणजे, या कुत्र्यांमध्ये दिसून येणारे विविध त्वचारोग आता नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत.

येणेगूर देवीसिंग 

शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. विशेष म्हणजे, या कुत्र्यांमध्ये दिसून येणारे विविध त्वचारोग आता नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत.

स्थानिक प्रशासकीय यंत्रणा या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत असून, यावर त्वरित नियंत्रण मिळवण्याची मागणी जोर धरत आहे.

सध्या रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांच्या झुंडी पाहायला मिळत आहेत. अनेकदा या कुत्र्यांना खाज, खरूज, दाद आणि फंगल इन्फेक्शन यांसारखे गंभीर त्वचारोग झाल्याचे दिसून येत आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हे आजार केवळ प्राण्यांपुरते मर्यादित नसून ते 'झुनोटिक' प्रकारचे आहेत. म्हणजेच, या बाधित कुत्र्यांशी थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्क आल्यास मानवामध्येही हे त्वचारोग पसरण्याचा दाट धोका असतो.

सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि वसाहतींमधील मोकळ्या जागांवर या कुत्र्यांचा वावर वाढल्याने संसर्गाची टांगती तलवार नागरिकांवर आहे. या गंभीर परिस्थितीचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा व्यक्तींना बसण्याची शक्यता आहे.

मुले अनेकदा बाहेर खेळताना या कुत्र्यांच्या संपर्कात येतात, ज्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची किंवा त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याची कोणतीही ठोस मोहीम राबवली जात नसल्याने हा प्रश्न आता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक बनला आहे.

नागरिकांना कोणता धोका?

त्वचारोगांनी ग्रस्त कुत्र्यांच्या संपर्कामुळे नागरिकांना खाज, दाद, पुरळ, त्वचेवर लाल चट्टे आणि संसर्गजन्य फंगल आजार होण्याची शक्यता असते. काही वेळा हे आजार दीर्घकाळ टिकून राहतात आणि उपचारांचा खर्चही वाढवतात.

संपर्काचे मार्ग कोणते?

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी बसलेले कुत्रे, त्या सोबत खेळणारी मुले, पाळीव प्राण्यांसोबत संपर्क, तसेच कुत्र्यांनी वापरलेल्या जागांशी थेट संपर्क. 

भटक्या कुत्र्यांना त्वचारोग अधिक का?

• भटक्या कुत्र्यांना नियमित अन्न, स्वच्छ पाणी, औषधोपचार आणि लसीकरण मिळत नाही.

• त्याची देखभाल कोणीही करीत नसल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

• तसेच घाणेरडे वातावरण, ओलावा आणि परजीवी संसर्गामुळे त्वचारोग अधिक बळावण्याची शक्यता असते.

काय काळजी घ्याल?

नागरिकांनी भटक्या कुत्र्यांशी थेट संपर्क टाळावा, लहान मुलांना कुत्र्यांपासून दूर ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. त्वचेवर खाज, पुरळ, आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या आरोग्य तपासणी व उपचारासाठी योग्य उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

भटक्या कुत्र्यांना विविध प्रकारचे त्वचारोग

• भटक्या कुत्र्यांमध्ये खरूज, खाज, फंगल इन्फेक्शन, केस गळणे, जखमा आणि त्वचेवर पुरळ यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात आढळतात.

• योग्य उपचारांचा अभाव, अपुरी स्वच्छता आणि पोषणाची कमतरता यामुळे हे आजार बळावले जात असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

भटक्या कुत्र्यांच्या संपर्कामुळे त्वचारोग पसरण्याचा धोका वाढतो. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. त्वचारोगाची कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. अर्चना विश्वेकर, त्वचारोग तज्ज्ञ, उमरगा जि. धाराशिव.

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid stray dogs: Skin disease risk rises; citizens urged to beware.

Web Summary : Stray dog populations are increasing in urban and rural areas, causing skin diseases in humans. Contact with infected dogs can cause skin infections, especially in children and the elderly. Citizens should avoid contact and seek immediate medical attention if symptoms arise. Authorities need to take action.
टॅग्स :कुत्राशेती क्षेत्रआरोग्यहेल्थ टिप्स