Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील अर्थकारण बदलणाऱ्या सुपारी पिकाचं संशोधन केंद्र लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 16:12 IST

गणेश प्रभाळेदिधी: दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राचा जागेअभावी रखडलेला विस्तार आता शक्य होणार आहे. या केंद्रासाठी २ हेक्टर ...

गणेश प्रभाळेदिधी: दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राचा जागेअभावी रखडलेला विस्तार आता शक्य होणार आहे. या केंद्रासाठी २ हेक्टर जागा व २० कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामुळे सुपारी पिकाबरोबर आंतरपिके संशोधनाला वाव मिळणार आहे.

बागायतदारांना उत्पन्न वाढीबरोबरच उद्योगासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा मिळणार आहेत. पर्यटन व्यवसायालाही चालना मिळणार आहे. कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत असणारे सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन शहरातील ४३ गुंठे जमिनीवर आहे. या केंद्राची स्थापना जून १९५३ साली झाली आहे.

तालुक्यातील अनेक शेतकरी या केंद्राला भेट देत असतात. मात्र, कमी जागेमुळे येथील सुपारी व त्यातील आंतरपिके संशोधनाला वाव मिळत नव्हता. विस्तारित सुपारी संशोधन केंद्रासाठी दिवेआगर येथील जागा प्रस्तावित होती.

मात्र, जागेबाबत स्थानिक वाद होते. हे वाद मिटल्याने या केंद्राला आता आपले हातपाय पसरता येणार आहेत. दोन हेक्टर जागेवर विस्तार करता येणार आहे.

यासाठी सुरुवातीला ५ कोटी ६४ लाख तर आता १४ कोटी ७१ लाख असे २० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहेत. आता अधिक उत्पादन व पिकांची आंतर पीक पद्धती विकसित करण्यासाठी संशोधन कार्य केले जाणार आहे.

श्रीवर्धनी सुपारीला मोठी मागणीयेथे नारळ, सुपारी ही महत्त्वाची पिके व त्यावर संशोधन केले जाते. याशिवाय जायफळ, दालचिनी व काळीमिरी तसेच अननस, हळद, आले आणि सुरण यांसारखी आंतरपिके यावरही प्रयोग केले जातात. येथे सुपारीचे रोपटे, नारळाची रोपे यांची विक्री शासकीय दराने होते. श्रीवर्धनी प्रकारच्या सुपारीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

श्रीवर्धनलाच हे सुपारी केंद्र का?• समुद्र किनारपट्टी भागात सुपारी हे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या भागातील स्थानिक सुपारी जातींमधून 'श्रीवर्धनी रोटा ही जात १९९८ मध्ये केंद्राकडून विकसित केली गेली. तिच्यात पांढऱ्या गऱ्याचे प्रमाण अधिक असून मऊ असते.• संशोधनास पोषक वातावरण व सुपीक जमीन यामुळे येथे हे संशोधन केंद्र उभारले आहे. सुपारी पिकावरील विविध रोग, कोकणातील बागांचे सर्वेक्षण करून विविध जातींचा संग्रह व अभ्यास करणे, अधिक उत्पन्न देणाऱ्या जातींचा अभ्यास करणे तसेच रोपे शेतकऱ्यांना पुरवणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.

कसे असणार केंद्र?सद्यःस्थितीत केंद्राच्या दोन हेक्टर क्षेत्राला कंपाऊंड वॉल करण्यात आले आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभाग अखत्यारीत होणाऱ्या पुढील कामात पॉटिंग शेड, अतिथी गृह, इलेक्ट्रिकल रूम आणि डीजी तसेच मळणी यार्ड असे अनेक सुविधा या केंद्रात उभारण्यात येणार आहेत.

दिवेआगर येथील केंद्राला शासनाकडून प्राप्त निधीनुसार येथे पाण्याची सुविधा मिळून लागवड व नर्सरी करण्यात येईल. या सर्व मूलभूत सुविधा मिळून केंद्र लवकरच कार्यान्वित होईल. - डॉ. एस. एन. सावंत, सुपारी संशोधन केंद्र प्रभारी अधिकारी

टॅग्स :शेतीशेतकरीपीककोकणसरकारराज्य सरकार