Join us

कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला सजग राहण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 24, 2023 5:40 PM

मराठवाडा विभागात आतापर्यंत कमी पर्जन्यमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्हा प्रशासनांना सजग राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड ...

मराठवाडा विभागात आतापर्यंत कमी पर्जन्यमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्हा प्रशासनांना सजग राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी आज दिले. पावसाने अधिक ओढ दिल्यास पर्यायी उपाययोजनांसाठी नियोजन, पिक नुकसानीचे पंचनामे, लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे काम प्राधान्याने करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.  

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सोहळा, संभाव्य नियोजित मंत्रिमंडळ बैठक, तसेच कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होत असलेली स्थिती याबाबत विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा आज घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपायुक्त (विकास) सुरेश बेदमुथा, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी सहभागी झाले होते.

विभागात पर्जन्यमानाची स्थिती ही समाधानकारक नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर होणारे परिणाम तपासावे. त्यासाठी मंडळनिहाय तपासण्या कराव्या. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर विभागात जलजीवन मिशनच्या कामांना गति द्यावी. यासंदर्भात जिल्हा परिषदस्तरावर दर 15 दिवसांनी तर जिल्हाधिकारीस्तरावर दरमहा आढावा घेण्यात यावा. तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेचे नियोजन करुन ठेवावे. विभागीय आयुक्त श्री. आर्दड म्हणाले की, लम्पी चर्म रोगाची गायवर्गीय जनावरांना लागण झाल्याचे दिसून येत आहे. प्रतिबंधात्मक लसी विभागात पुरेशा उपलब्ध आहेत. त्यामुळे जनावरांचे लसीकरण करुन घेण्यास प्राधान्य द्यावे. ज्यांची जनावरे दगावली आहेत अशा पशुपालकांना द्यावयाच्या मदतीबाबत तात्काळ प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

टॅग्स :शेतकरीहवामानमधुकर राजे आर्दंडपाऊसपाणी